गेले चार ते पाच दिवस कोकण तसेच विदर्भाला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला असून, सोमवारी दरड कोसळून दापोली तालुक्यात ५, तर कर्जत तालुक्यात कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. विदर्भात तीन जण नाल्यात पडून मृत्युमुखी पडले. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
राज्याच्या बहुतांश भागांत रविवारी रात्री व सोमवारी चांगला पाऊस पडला. हीच स्थिती बुधवापर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, कोकण व विदर्भात पावसाचा जोर तुलनेने अधिक असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. रायगड जिल्ह्य़ातील जनजीवन गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. अनेक नद्यांना पूर आल्याने परिसर जलमय झाला आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहे. नेरळजवळील मोहाची वाडी येथे सोमवारी सकाळी दरड कोसळली. यात दिघे कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. घराची िभत अंगावर पडल्याने हे सर्व जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना बचावपथकांनी बाहेर काढले. जाईबाई मारुती कदम, किसन राघो दिघे, सुनंदा किसन दिघे, अर्चना किसन दिघे, स्वप्रेश किसन दिघे अशी मृतांची नावे आहेत. पाच मृतांच्या वारसांना राज्य शासनातर्फे २० लाख रुपये आíथक मदत देण्यात आली.
दापोली, दाभोळ दुर्घटनेतील मृतांमध्ये कुटुंबातील कमलाकर, कमलाक्षी, दिनकर, मधुकर आणि मधुमालती महाडिक यांचा समावेश असून, एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस सुरू आहे. सुमारे एक हजार विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे, तर चार तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
द्रुतगती मार्ग ठप्प
लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खंडाळा बोगद्याजवळ सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी काही वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून तर काही वाहने द्रुतगती महामार्गावरच पुणे बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर एका मार्गिकेने सोडण्यात आली. प्रचंड मोठय़ा आकाराचे दगड रस्त्यावर पडल्याने ते बाजूला करण्यात अडथळा येत असून रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. लोणावळा परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
कार्ला गडाचे नुकसान
एकविरा देवीचे स्थान असलेल्या लोणावळ्याजवळील कार्ला गडावरदेखील रविवारी रात्री मोठय़ा प्रमाणात डोंगरावरील सल दगड खाली पडल्याने ट्रस्टच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 dead as rain lash maharashtra