मुंबईमधील मध्य रेल्वेवरील चार, तर पश्चिम रेल्वेवरील नऊ उड्डाणपूल धोकादायक अवस्थेत असून गणेशोत्सव काळात काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणेश आगमन आणि विसर्जनाच्या वेळी उड्डाणपुलांवरून भाविकांची जा-ये सुरू असते. मुंबईमधील नऊ उड्डाणपूल धोकादायक बनले असून काही उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. तर काही पुलांची दुरुस्ती प्रस्तावित आहे.
यंदा करोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. तसेच आगमन – विसर्जनाची मिरवणूक काढण्यास मनाई आहे. तरीही या दोन्ही दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील धोकादायक १३ पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुलांवरून जाताना दक्षता घ्या
मध्य रेल्वे: घाटकोपर उड्डाणपूल, करीरोड उड्डाणपूल, चिंचपोकळी उड्डाणपूल, भायखळा उड्डाणपूल.
पश्चिम रेल्वे: मरिन लाइन्स उड्डाणपूल, सॅण्डहर्स्ट उड्डाणपूल, चर्नीरोड – ग्रॅन्टरोड दरम्यानचा फ्रेंच उड्डाणपूल, केनेड उड्डाणपूल, ग्रॅन्टरोड – मुंबई सेंट्रल दरम्यानचा फॉकलंड उड्डाणपूल, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील बेलासीस उड्डाणपूल, महालक्ष्मी स्टील उड्डाणपूल, प्रभादेवीचा कॅरोल उड्डाणपूल, दादरचा टिळक उड्डाणपूल.