मुंबई : लोअर परेल येथील कमला मिल परिसरातील एका व्यापारी केंद्राच्या इमारतीमधील उद्वाहन (लिफ्ट) चौथ्या मजल्यावरून थेट पहिल्या मजल्यावर आदळल्याची भयंकर घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. यावेळी उद्वाहनातील १२ ते १४ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोअर परेल येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिल या व्यावसायिक संकुलातील ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या सी विंगमध्ये ही दुर्घटना घडली. ही इमारत १६ मजली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास चौथ्या मजल्यावरून उद्वाहन थेट पहिल्या मजल्यावर येऊन आदळली. दुर्घटनाग्रस्त उद्वाहनात अडकलेल्या १२ ते १४ जणांना तेथील कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. आठ जखमींना परळ येथील ग्लोबल रुग्णालयात, तर एका व्यक्तीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य चार जणांना किरकोळ मार लागला आहे.
हेही वाचा… सहा महिन्यात केवळ ३८ काँक्रीट रस्ते, कंत्राटदारांना कार्यादेश देऊनही कामे संथगती
हेही वाचा… मुंबई: महिलेची फसवणूक करून एटीएम केंद्रातून ५० हजार रुपये काढणारी टोळी गजाआड
ग्लोबल रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये प्रियांका चव्हाण (२६), प्रतीक शिंदे (२६), अमित शिंदे (२५), महम्मद रशीद (२१), प्रियांका पाटील (२८), सुधीर सहारे (२९), मयूर गोरे (२८), तृप्ती कुबल (४६) यांचा समावेश असून या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर केईएम रुग्णालयात किरण चौकेकर (४८) दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.