मुंबई : राज्यातील १३ एसटी बस स्थानकांच्या बसपोर्टसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या धोरणानुसार एसटी स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र, एसटीची जागा ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेऊन पुन्हा इमारत महामंडळाला हस्तांतरित करावी लागणार असल्याने या धोरणाला नापसंती दर्शवली जात आहे. त्यामुळेच आता एसटीची जागा ३० वर्षांऐवजी ६० वर्षांसाठी विकसित करण्याचा भाडेकरार करण्याच्या राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी स्वागत केले.

एसटी महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करून त्या ३० वर्षांसाठी भाडे तत्त्वावर देऊन त्यातून उत्पन्न मिळवण्याचा मार्ग महामंडळाने २००२ साली स्वीकारला. भाडेकराराची ३० वर्षे ही मुदत अत्यंत कमी असल्यामुळे या योजनेला गेल्या २०-२२ वर्षांमध्ये म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या काळात केवळ ४८ प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ ही योजना व्यापक स्वरूपात राबविण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. या योजनेद्वारे एसटीच्या जास्तीत जास्त जागा भाडेतत्त्वावर देऊन त्यातून चांगला निधी उभारणे महामंडळाच्या विचाराधीन होते.

हे ही वाचा…Govandi honour-killing case: हिंदू मुलाशी मुस्लीम मुलीने लग्न केल्यामुळे दोघांचे ऑनर किलिंग; चार अल्पवयीन आरोपींवर प्रौढ म्हणून खटला चालणार

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ योजनेअंतर्गत व्यावसायिक तत्वावर जमिनीचा विकास करण्यात येणार असून त्यासाठी ती हस्तांतरित करण्याची मुदत ३० वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या महामंडळाकडे असलेल्या १,५०० हेक्टर ‘लँड बँकेचा’ विकास या माध्यमातून होऊ शकतो. सध्या १०० पेक्षा जास्त प्रकल्प या योजनेअंतर्गत विकसित करण्याचा आराखडा महामंडळ स्तरावर आखण्यात येत असून लवकरच त्यापैकी २० व्यवहार्य प्रकल्पांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. भविष्यात एसटीला तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ करा या योजनेतून शेकडो कोटी रुपये निधी मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महामंडळाच्या सध्याच्या आस्थापनांची (बसस्थानक, आगार व कार्यालय) पुनर्बांधणी करून मिळणार आहे. त्यामुळे एसटीला भविष्यात चांगले दिवस येतील. अर्थात, याद्वारे प्रवाशांना चांगल्या बस, विकसित बस स्थानके आणि स्वच्छ व सुंदर प्रसाधनगृहे उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे भरत गोगावले यांनी म्हटले.