मुंबईतील गोरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका १३ वर्षीय मुलावर सहा अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी वेगवेगळ्या वेळी पीडित मुलाचं लैंगिक शोषण केलं आहे. या सहा अल्पवयीन मुलांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडीओ शूट केले होते. त्या व्हिडीओच्या आधारे १३ वर्षीय पीडित मुलाला ब्लॅकमेल केलं जात होतं. यातील एक व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित मुलाच्या काकानं हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
हेही वाचा- कंपनीतील तरुणीचा मालकाकडून विनयभंग; मालकाच्या विरोधात गुन्हा
पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (POCSO) अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी १४ ते १६ वयोगटातील असून त्यांना आता बाल न्याय मंडळासमोर (जेजेबी) हजर केलं जाणार आहे.
हेही वाचा – नागपूर : तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी आणि पीडित मुलगा एकाच चाळीत राहतात. या वर्षी मार्चमध्ये एका आरोपीनं पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. दरम्यान, अन्य एका आरोपीनं संबंधित अत्याचाराचा व्हिडीओ तयार केला. यानंतर मुख्य आरोपीसह अन्य पाच जणांनी पीडित मुलाला ब्लॅकमेल करून वेळोवेळी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार जूनपर्यंत सुरू होता. आरोपींनी पीडित मुलाला मारहाण करण्याची धमकी दिल्याने त्यानं या घटनेची माहिती घरी कुणालाही दिली नव्हती.