मुंबईः पवई येथे १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नातेवाईकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पीडित मुलीच्या वडिलांचा काका आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीची आई कामाला गेल्यावर आरोपी गेल्या एका महिन्यापासून तिच्यावर अत्याचार करीत होता. याबाबत पीडित मुलीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी रविवारी याप्रकरणी तक्रार केली. पवई पोलिसांनी सोमवारी आरोपीविरोधात बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी मूळचा बिहारमधील रहिवासी असून सध्या पवई परिसरात राहतो. आरोपीने पीडित मुलीवर अत्यााचर केल्यानंतर हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. अखेर तिने धाडस करून वडिलांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करीत आहेत.