नवीन वीजजोडणी, वीजपुरवठय़ाबाबतच्या तक्रारींचे निवारण यांसारख्या ग्राहकसेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी ‘महावितरण’ राज्यातील १३० शहरांत विशेष यंत्रणा उभारणार आहे. त्यात वीजबिलाची वसुली, ग्राहकांच्या तक्रारी, देखभाल-दुरुस्ती यांसारख्या कामांसाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट असेल. त्यामुळे कामाची जबाबदारी व उत्तरदायित्व निश्चित होईल आणि ग्राहक सेवा अधिक कार्यक्षम होईल.
सध्या ‘महावितरण’च्या शाखा कार्यालयांत नवीन जोडण्या देणे, तक्रारी सोडवणे, देखभाल दुरुस्ती, वीजबिल वसुली आदी कामे केली जातात. ही कामे सर्व जण सामूहिकरीत्या करीत असल्याने कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करता येत नव्हती. त्याचा परिणाम कार्यक्षमतेवर होत असे. त्यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी ‘महावितरण’ने मे महिन्यापासून अहमदनगर, कोल्हापूर, धुळे, नांदेड, चंद्रपूर आणि अमरावती या शहरांत स्वतंत्र गट पद्धती प्रायोगिक तत्त्वावर लागू केली होती. त्यातून या शहरांतील ग्राहक सेवेत खूपच सुधारणा झाल्याचे आढळून आले. प्रयोग यशस्वी झाल्याने ‘महावितरण’ने ही पद्धती इतरही शहरांत राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता पुनर्रचित गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रम राबवण्यात येत असलेल्या राज्यातील १३० शहरांत ग्राहक सेवेसाठी ही विशेष केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यात वाशी, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भांडुपसारख्या महामुंबई परिसरातील शहरांचाही समावेश असेल. शहरी भागातील ‘महावितरण’च्या शाखा कार्यालयांत ही यंत्रणा कार्यरत राहील. त्यांना वाहन व इतर आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. ही सर्व १३० शहरे मध्यवर्ती ‘कॉल सेंटर’ला जोडली जातील. विशेष केंद्रांच्या पद्धतीमुळे ग्राहक तक्रार, नवीन जोडणी आदी ग्राहकसेवेशी संबंधित प्रत्येक कामासाठी स्वतंत्र गट असेल. ग्राहकांच्या समस्येवर कार्यवाही काय झाली हेही ग्राहकांना सांगितले जाईल. शिवाय तक्रार सोडवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ लागल्यास ती तक्रार वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली जाईल.

Story img Loader