दोन वर्षांपूर्वी १३ जुलै रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी यासीन भटकळ याला हजर करण्याचे आदेश मुंबईच्या विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने सोमवारी दिले. यासीन व त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर उपाख्य तरबेज यांना गेल्या आठवडय़ात नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे.
१३/७च्या बॉम्बस्फोटांमध्ये यासीन आणि तरबेज यांनी कळीची भूमिका बजावली असून त्यांच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे आणि स्फोटाविषयी अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) या दोघांची चौकशी करायची असून त्यांना हजर करण्याबाबत अटक आदेश देण्याची विनंती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. ती मान्य करीत विशेष ‘मोक्का’ न्यायालयाचे न्या़ वाय. डी. शिंदे यांनी हे आदेश दिले.
१३ जुलै २०११ रोजी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस तसेच दादर कबुतरखाना येथे एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये २७ निष्पाप मुंबईकर मृत्युमुखी पडले होते. एटीएसने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात यासीन, तरबेज आणि वकास या आरोपींना फरारी आरोपी दाखवून त्यांनीच हे बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता. यातील वकास हा अद्यापही फरारी आहे. यासीनला एटीएसने बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार दाखविले आहे. एटीएसच्या दाव्यानुसार, या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी नदीम शेख याने आपल्या कबुलीजबाबात यासीन हा बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असल्याचे आणि त्याने दादर येथे बसथांब्याजवळ, वकास आणि तरबेजने झवेरी बाजार तसेच ऑपेरा हाऊस येथे दुचाकीमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.