मुंबई : सोमवारी वाऱ्यामुळे घाटकोपर येथे पूर्व द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर उभा करण्यात आलेला महाकाय जाहिरात फलक कोसळला. त्याखाली शेकडो नागरिक अडकले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोसळलेला फलक अनधिकृत असल्याचे समोर आले असून पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा जाहिरात फलक मालकावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी चारच्या सुमारास हा फलक पेट्रोल पंपावर कोसळला, त्यावेळी तेथे शंभरपेक्षा अधिक नागरिक आडोशाला उभे होते. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून ७४ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही फलक पूर्णपणे हटवण्यात यश आले नसून एनडीआरएफ, अग्निशमन आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरू आहे. अद्यापही फलकाखाली काहीजण अडकल्याची भिती आहे. त्यानुसार अडकलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. हा जाहिरात फलक बाजूला करण्यासाठी काल रात्री तेथे मोठ्या क्रेन आणण्यात आल्या आहेत. दुपारपर्यंत हा फलक बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा…Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; LIVE VIDEO समोर!

रेल्वे पोलीस प्रशासनाच्या जागेवर हा पेट्रोल पंप असून तेथे जाहिरात फलक लावण्यात आला होता. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा फलक लावणारे भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर ३०४,३३८,३३७, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पंतनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 dead as unauthorized billboard collapses in ghatkopar mumbai police investigate mumbai print news psg
Show comments