मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक्याजवळील मेंढवन खिंडीत बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास टँकर आणि लक्झरी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात १४ जण जागीच ठार झाले, तर ३९ जण गंभीर जखमी झाले आहेत. साबण बनविण्यासाठी लागणारे रसायन घेऊन गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला टँकर दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने मुंबईकडे येणाऱ्या लक्झरी बसवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की बसची एक बाजू पूर्णपणे कापून निघाली.
गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लक्झरी बसमध्ये राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील रहिवाशांचा भरणा होता. सकाळी सात वाजता मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेंढवन खिंडीत बस येताच समोरून भरधाव वेगाने येणारा रसायनाचा टँकर दुभाजक ओलांडून बसवर आदळला. टँकरचालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसच्या एका बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की लक्झरी बसमधील एकूण ५३ प्रवाशांपैकी १४ जण जागीच ठार झाले, अशी माहिती कासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी दिली. मृतांमध्ये पाच महिला व एका बालकाचा समावेश आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालकही ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३९ जणांवर मुंबईतील सायन तसेच गुजरातमधील वापी, वसईतील भगवती रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 killed as bus collides with chemical tanker on mumbai ahmedabad highway
Show comments