मुंबई : परदेशात कुरियरमार्फत अंमली पदार्थ पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगून १४ लाख रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली. फसवणुकीतील १३ लाख ९० हजार गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून मोबाइलचे ४३ सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल
हेही वाचा – मुंबई : अंडे दोन रुपयांनी महागले, दर प्रति डझन २० ते २४ रुपयांनी वधारले
कुशल बाबूलाल माळी (२८) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो नाशिकमधील रहिवासी आहे. तक्रारदारांना ८ जानेवारी रोजी दूरध्वनी आला होता. समोरील व्यक्तीने आपण कुरियर कंपनीतून बोलत असून तैवानमध्ये अंमली पदार्थ व बेकायदेशीर वस्तू पाठवल्याबाबत गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलीस अधिकारी, केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून त्याने धमकावले. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदारांनी १४ लाख ३६ हजार रुपये आरोपीला पाठवले. तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी १३ लाख ९० हजार रुपये गोठवले आहे. याप्रकरणी आरोपीलाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.