दर दिवशी तब्बल ४० ते ४२ लाख प्रवाशांचा भार वाहून नेणाऱ्या मध्य रेल्वेवर फुकटय़ा प्रवाशांना पकडण्याचे प्रकार दर दिवशी घडत असतातच. मात्र राखी पौर्णिमेच्या दिवशी मध्य रेल्वेवर सरासरीच्या तब्बल साडेचार लाख जादा तिकिटांची विक्री झाली. दर दिवशी मध्य रेल्वेवर साधारण दहा ते साडेदहा लाख तिकिटांची विक्री होते. मात्र राखी पौर्णिमेच्या शनिवारी ही संख्या साडेचौदा लाखांच्या आसपास पोहोचली होती. विशेष म्हणजे यात एटीव्हीएमवरून तिकीट काढणाऱ्यांची संख्या दीड लाखांनी वाढली होती. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मध्य रेल्वेला जादा तिकिटांची ‘ओवाळणी’ मिळाली.
राखी पौर्णिमेच्या दिवशी मुंबईकर मोठय़ा संख्येने बाहेर पडल्याने त्याचा परिणाम रेल्वेच्या तिकीट विक्रीवरही झाला. शनिवारी मध्य रेल्वेची तब्बल १४ लाख तिकिटे एकाच दिवशी खपली. यात तिकीट खिडक्यांवरील तिकिटांची संख्या ७.८० लाख एवढी होती. तर जनसाधारण तिकीट आरक्षण केंद्रातून काढलेल्या तिकिटांची संख्या तीन लाखांपर्यंत होती. मात्र, मध्य रेल्वेवर त्या दिवशी एटीव्हीएममधून विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या ३.९० लाख एवढी होती. एटीव्हीएममार्फत दर दिवशी सव्वा दोन ते अडीच लाख तिकिटे विकली जातात. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या दिवशी या संख्येत तब्बल सव्वा ते दीड लाखाने वाढ झाल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संतोष व्यक्त केला. या दिवशी एटीव्हीएममधून विकल्या गेलेल्या तिकिटांमार्फत रेल्वेला ८२,०९,२२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
तिकिट तपासणीसांचा धाक
मध्य रेल्वेवर विकल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या सरासरी १० ते ११ लाख एवढी असते. मात्र दर दिवशी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी मोठा वर्ग हा मासिक-त्रमासिक पासधारक असतो. त्यामुळे तिकीट काढून जाणारे प्रवासी कमी असतात. मात्र सुटीच्या दिवशी अशा प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. त्यातच तिकीट तपासनीसांचा ताफा वाढवून तिकीट तपास अधिक काटेकोरपणे केला जात असल्याने प्रवासी तिकीट काढण्यावर भर देतात.