या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ऑनलाइन गेम खेळण्याची आवड असलेल्या १४ वर्षीय मुलाच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. दादर पूर्व येथील हिंदूमाता परिसरातील राहत्या घरी त्याने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मुलगा खेळत असलेल्या ‘फ्री फायर’ या ऑनलाइन गेमवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी आणली आहे. 

मृत मुलगा इयत्ता सातवीतील विद्यार्थी होता. या मुलाचे वडील बांधकाम कंपनीमध्ये डिझायनर म्हणून कामाला आहेत. रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्यांना मुलाचा दूरध्वनी आला. ते पत्नीसोबत प्रवास करत असल्यामुळे त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. त्यानंतर त्यांनी मुलाला अनेक दूरध्वनी केले पण त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दादासाहेब फाळके मार्ग येथील घरी मुलाचे पालक आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यावेळी त्यांनी घराची खिडकी तोडून दरवाजा उघडला असता मुलाने आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी याबाबतची माहिती भोईवाडा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात नेला.

तो मुलगा नियमितपणे ‘फ्री फायर’ ऑनलाइन गेम खेळत होता. पण त्याने नेमकी आत्महत्या कशामुळे केली, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुलाचे वागणे सामान्य होते. ऑनलाइन शाळेतही त्याचे वागणे व्यवस्थित होते, असे मुलाचे कुटुंबीय व शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे. तो खेळत असलेला गेम एकटा खेळता येत नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी त्याच्यासोबत गेम खेळणाऱ्या गटाबाबत पोलीस माहिती घेत आहेत. त्यासाठी त्याचा दूरध्वनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 year old boy commits suicide while playing online games akp
Show comments