मुंबई: म्हाडामधील १४०० कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे कवच लाभले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना बँकेकडून जीवन विमा देण्यात आला आहे. कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मिळणार आहेत. तसेच कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये मिळणार आहे.
मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना जीवन विम्याची योजना लागू व्हावी यासाठी म्हाडा कर्मचारी संघटना आणि प्रशासन प्रयत्नशील होते. या प्रयत्नास यश आले असून बँक ऑफ महाराष्ट्रने म्हाडाची मागणी मान्य केली आहे. या बँकेत वेतनाची खाती असलेल्या १४०० कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे कवच देण्यात आले आहे.
हेही वाचा… पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लक्ष्य गाठताना महानगरपालिकेची दमछाक; दोन लाख फेरीवाले आणायचे कुठून
कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबियांना पाच लाख रुपये मिळणार असून कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ५० लाख रुपये मिळणार आहे. त्याचवेळी अंशत कायमस्वरूपी अंपगत्व आल्यास २० लाख रुपये तर हवाई अपघातात मृ्त्यू झाल्यास एक कोटी रुपये मृत कर्चमाऱ्याच्या कुटुबाला मिळणार असल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाचे वित्त नियंत्रक अजयसिंग पवार यांनी दिली. कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.