मुंबई : विकासक आणि प्रकल्पाविरोधातील ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण जलद गतीने व्हावे यासाठी महारेराने सलोखा मंच स्थापन केला असून सलोखा मंचाच्या माध्यमातून कमी कालावधीत तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. त्यामुळे सलोखा मंचाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे तक्रारीही मोठ्या संख्येने निकाली काढल्या जात आहेत. राज्यभरातील ५२ सलोखा मंचाने आतापर्यंत १,४७० तक्रारी निकाल्या काढल्या आहेत.
महारेराच्या माध्यमातून गृहप्रकल्प वा विकासकाबाबतच्या तक्रारींचे निवारण केले जाते. मागील काही वर्षांपासून महारेराकडे दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे साहजिकच तक्रारींचे निवारण करण्यासाठी काहीसा वेळ लागतो. ही बाब लक्षात घेता तक्रारींचे कमी कालावधीत निवारण व्हावे यासाठी महारेराने सलोखा मंचाची संकल्पना पुढे आणली. तसेच राज्यभर सलोखा मंचांची स्थापना करण्यात आली आहे. या सलोखा मंचामध्ये विकासकांच्या स्वयंविनियामक संस्था आणि ग्राहक पंचायतींमधील अनुभवी प्रतिनिधींचा समावेश आहे. सध्या राज्यभर ५२ सलोखा मंच कार्यरत आहेत. महरेराकडे आलेला तक्रारदार आणि समोरील पक्ष अशी दोघांची संमती असल्यास तक्रारीचे निवारण महरेराऐवजी आधी सलोखा मंचाकडे पाठवण्यात येते. येथे कमी वेळेत उभयतांच्या सहमतीने तक्रारींचे निवारण होते. त्यामुळे पुढे या प्रकरणाला आव्हान (अपीलमध्ये जाण्याचा) देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सलोखा मंच स्थापन झाल्यापासून आतापर्यंत दाखल होणाऱ्या तक्रारी आणि निकाली काढल्या जाणाऱ्या तक्रारींची संख्या वाढत आहे.
आतापर्यंत ५२ सलोखा मंचांच्या माध्यमातून १४७० तकारींचे निवारण करण्यात आले आहे. तर सध्या या मंचांकडे ७७५ प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथे हे मंच कार्यरत आहेत.