कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा दरम्यान १५ डब्यांची उपनगरी गाडी सुरू करण्यासाठी अद्याप परवानगीच मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वेकडे निधी नाही, मुंबई रेल्वे विकास महामंडळ कल्याणपुढे काम करण्यास तयार नाही आणि प्रवासी संघटनांचा सर्व स्थानकांवर गाडी थांबलीच पाहिजे, या दुराग्रहासह ‘प्रथम सुविधा द्या’ या मागणीमुळे १५ प्रवास आणखी पुढे ढकलला गेला असल्याचे सांगण्यात येते.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण दरम्यान सध्या १५ डब्यांच्या गाडीच्या आठ फेऱ्या होत आहेत. कल्याणच्या पुढेही ही गाडी चालविण्यात यावी, अशी प्रवाशांनी केलेली मागणी मध्य रेल्वेने मान्य केली होती. ज्या स्थानकांच्या फलाटांची लांबी १५ डब्यांची गाडी उभी राहण्याइतकी आहे आणि अन्य अभियांत्रिकी बदल करण्याची आवश्यकता नाही अशा स्थानकांवर ही गाडी थांबविण्यात येणार होती. मात्र प्रथम स्थानकांवर सुविधा द्या, फलाटांवर छत बांधा या मागणीसह सर्वच स्थानकांवर गाडी थांबलीच पाहिजे, असा दुराग्रह प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी धरला.

Story img Loader