परदेशातून कुरियरद्वारे अंमलीपदार्थांची तस्करी करण्याचा डाव महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) हाणून पाडला. याप्रकरणी एका नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या कारवाईत आंतरराष्ट्रीय कुरियरद्वारे पॅरिसवरून आलेले सुमारे दोन किलो एम्फेटामाईन हे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत १५ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा डीआरआयला संशय आहे.

हेही वाचा- मुखपट्टी नियम उल्लंघनप्रकरणी खटले निकाली काढण्यासाठी समितीची स्थापना; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

आंतरराष्ट्रीय कुरियरद्वारे अंमलीपदार्थांची भारतात तस्करी होण्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार डीआरआयने मुंबईतील एअर कार्गो संकुल येथे शोध मोहीम राबवून एक संशयीत पार्सल ताब्यात घेतले. त्यावर नालासोपारा येथील पत्ता नमुद होता. त्याची तपासणी केली असता त्यात एक किलो ९०० ग्रॅम एम्फेटामाईन या अंमलीपदार्थांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या अंमलीपदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १५ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. प्लास्टिकच्या आवरणात लपवून या अंमलीपदार्थांची तस्करीत करण्यात येत होती.

हेही वाचा- राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धोक्याचा; १००४ पैकी ६१० अपघात प्रवण क्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर

या प्रकरणातील आरोपी अद्याप डीआरआयच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे मोठ्या शिताफीने डीआरआयच्या अधिकाऱ्याने पाळत ठेऊन कुरियर स्वीकारणाऱ्याला प्रथम ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्या साथीदाराची माहिती मिळाली. डीआरआयने वेळ न दवडता तात्काळ त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले. उभयतांच्या चौकशीअंती या संपूर्ण प्रकरणामागे नायजेरियातील नागरिकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या माहितीच्या आधारे नायजेरियन नागरिकालाही अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader