मुंबईः कंपनीत पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहेत. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी मॉरिशसमधील एका बँकेच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून त्यावरून ई-मेल केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार कमल के. सिंह हे रोल्टा ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आहेत. तक्रारीनुसार, आरोपी हा एका कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करीत आहे. त्याने रोल्टा ग्रुफ ऑफ कंपनीजमध्ये पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. त्या बदल्यात तक्रारदारांना एका कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच मार्जिन मनीच्या नावाखाली तक्रारदार यांच्याकडून तीन कोटी रुपये स्वीकारले. रोल्टा कंपनीत गुंतवणूक करीत असल्याचे भासवण्यासाठी आरोपीने मॉरिशस येथील ॲफ्रोएशिया बँकेच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून त्यावरून कंपनीला ई-मेल पाठवले. तसेच गुंतवणुकीची रक्कम हस्तांतरित केल्याचे भासवण्यासाठी बँकेचे स्वीफ्ट एमटी १०३ तक्रारदारांना ई-मेलद्वारे पाठवले, असे तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे तक्रारदारांची एकूण १५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
हेही वाचा – एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार
हेही वाचा – धारावी पुनर्विकासात इमारत, चाळवासीयांना उपलब्ध आकारमानापेक्षा मोठे घर मिळणार!
याबाबत तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीबाबत प्राथमिक चौकशी केल्यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.