मुंबई : राज्यातील अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक दर्जाच्या १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गृहमंत्रालयाने सोमवारी या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात राज्य कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अभिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती, महाराष्ट्र राज्य, मुंबई) येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय अपर पोलीस महासंचालक (दळणवळण) सुनील रामानंद यांची अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्यव) पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रवीण साळुंखे यांची अपर महासंचालक (लोहमार्ग, मुंबई) या पदी बदली करण्यात आली.
हेही वाचा >>> लघु उदंचन केंद्र असतानाही गांधी मार्केट परिसरात पाणी भरले
वैधमापन शास्त्राचे नियंत्रक पदावर कार्यरत सुरेश मेखला यांची अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) या पदावर बदली करण्यात आली आहे. महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागातील अपर महासंचालक दीपक पांडे यांची वरिष्ठ अधिकारी सुनील रामानंद यांच्या बदलीने रिक्त झालेल्या अपर महासंचालक (दळणवळण) या पदावर बदली करण्यात आली आहे.
पाच अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांनसह १० महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही सोमवारी गृह विभागाकडून जारी करण्यात आले. त्यात सुहास वारके यांची विशेष महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार), नागपूरच्या पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची पोलीस महानिरीक्षक (नागरी हक्क संरक्षण) व विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र छेरिंग दोरजे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) या पदी बदली करण्यात आली आहे. छेरिंग दोरजे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या नागपूर परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षक पदी डी.के. पाटील-भुजबळ यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पुणे शहर सहपोलीस आयुक्त पदावर रंजनकुमार शर्मा यांची बदली करण्यात आली आहे.
राज्य पोलीस सेवेतील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या
भारतीय पोलीस सेवेतील १५ अधिकाऱ्यांसह राज्य पोलीस सेवेतील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात दहशतवाद विरोधी पथक, पुणे पदी अनिल शेवाळे, सहाय्यक आयुक्त, पुणे या पदी धन्यवाद गोडसे, उपविभागीय अधिकारी परतूर येथे दादाहरी चौरे, उपविभागीय अधिकारी, पाटण विजय पाटील, पोलीस उपअधिक्षक( अनुसचीत जाती प्रमाणपत्र पडताळणी,पालघर) मनोहर पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर येथे सुधाकर चंद्रभान सुराडकर यांची बदली करण्यात आली.