मुंबई : निवडणूक काळात मुंबईबाहेर बदली करण्यात आलेल्या १५५ पैकी १५ पोलिसांना कार्यमुक्त करण्यास महासंचालक कार्यालयाने नकार दिला आहे. या १५ पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईबाहेरील बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे. त्यानंतर त्यांना कार्यमुक्त करुन त्यांच्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी पाठवले जाईल, असे महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता हे १५ पोलीस अधिकारी सरकार दरबारी खेटे घालत आहेत.

जिल्ह्यात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर तात्काळ बदली करण्यात यावी, असे आदेश निवडणूक आयोगाने जारी केले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी पहिल्या टप्प्यात ११२ आणि नंतर ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यापैकी १४० अधिकारी मुंबईबाहेरील बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. परंतु १५ अधिकारी नागपूर, अकोला, लातूर येथील नियुक्तीच्या ठिकाणी गेले आणि नंतर वैद्यकीय रजेवर निघून गेले. त्यानंतर ते पुन्हा फिरकलेच नाहीत. ११ डिसेंबर रोजी या सर्व १५५ पोलीस अधिकाऱ्यांच्या मुंबईत पुन्हा नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. त्यानंतर हे सर्व अधिकारी तात्काळ मुंबईत आले आणि रुजू झाले. मात्र १५ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयाने कार्यमुक्त न केल्याने त्यांना रुजू होता आले नाही. महासंचालक कार्यालयाने या १५ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यालयात हजर होण्यास सांगितले आहे. त्यानंतरच त्यांना कार्यमुक्त करायचे किंवा नाही हे ठरविले जाणार आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले होते.

हेही वाचा – रवींद्र वायकरांची खासदारकी कायम राहणार, अमोल कीर्तीकरांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

हेही वाचा – मुंबई : चालू आर्थिक वर्षात ११ हजार मांजरांच्या निर्बीजीकरणाचे लक्ष्य

u

शुक्ला यांना रजेवर पाठविण्यात आले होते. निवडणूक संपल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याच पद्धतीने मुंबईबाहेर बदली झालेल्या पोलिसांचीही पुनर्नियुक्ती करण्यात आली. १५ पोलीस अधिकाऱ्यांनी शिस्तीचे पालन करुन नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बदलीच्या ठिकाणी रुजू झालेल्या उर्वरित १४० पोलीस अधिकाऱ्यांना निवडणुकीआधी असलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करुन घेण्यात आले आहे. काही अधिकारी वरिष्ठ निरीक्षक पदी नियुक्त होते. त्यांना त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. अशा ठिकाणी नव्या वरिष्ठ निरीक्षकाची नियुक्ती न करता वरिष्ठ असलेल्या पोलीस निरीक्षकाकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला होता.

Story img Loader