मुंबई : पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक १ च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिघाड झाला. त्यामुळे पिसे उदंचन केंद्रातील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ उदंचन पंप बंद झाले आहेत. सहा पंपांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम १४ व १५ डिसेंबर रोजी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक १ च्या बी फेड करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास अचानक बिघाड झाला. पिसे उदंचन केंद्रात एकूण २० उदंचन पंप आहेत. त्यापैकी सहा उदंचन पंप बंद पडले आहेत. हे वृत्त समजताच महापालिकेने बंद पडलेल्या सहा उदंचन पंपांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. १४ आणि १५ डिसेंबर रोजी पंपाच्या दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात १४ आणि १५ डिसेंबर रोजी १५ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडीतील काही परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो. सहा उदंचन पंप बंद पडल्यामुळे ठाणे आणि भिवंडमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातही १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – मंत्र्यांची संख्या, खात्यांवरून घोळ; रखडलेला शपथविधी उद्या नागपूरमध्ये?
खबरदारीचा उपाय म्हणून १४ आणि १५ डिसेंबर या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ‘या’ भागांत कमी पाणीपुरवठा
शनिवारी पहाटे पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) मध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे पिसे येथील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ पंप बंद झाले. त्यांच्या दुरुस्तीचे काम शनिवार, १४ डिसेंबर व रविवार, १५ डिसेंबर रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे १४ डिसेंबर ते दिनांक १५ डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. या कामामुळे, रविवार १५ डिसेंबरपर्यंत, ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा , पाचपाखाडी , बी – केबीन, महागीरी, कोपरी,आनंदनगर, गांधीनगर, हाजुरी, किसननगर, लुईसवाडी, अंबिका नगर या भागातील पाणी पुरवठा कमी होईल. खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.