मुंबई : पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत सोलापूरमधील रे नगर येथे ३६५ एकर जागेवर राज्यातील सर्वात मोठा ३० हजार घरांचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. अंसघटित श्रमिक कामगारांसाठी ही घरे असून पाच लाखांत त्यांना हक्काची घरे उपलब्ध करण्यात येत आहेत. या प्रकल्पातील १५ हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना घराचे वितरण करण्याचे, चावी वाटपाचे नियोजन म्हाडाकडून सुरु आहे. यावर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> क्लीन अप मार्शलच्या नेमणुका रखडल्या; प्रशासकीय प्रक्रियेमुळे विलंब

सोलापूरमधील अंसघटित कामगारांनी सोसायटी करून ३६५ एकर जमीन घेतली असून म्हाडा पीएमएवायअंतर्गत या जागेवर कामगारांना घरे बांधून देत आहे. या प्रकल्पास २०१७ मध्ये सुरुवात झाली असून यात तळमजल्यासह दोन मजली अशा एकूण ८३३ इमारती बांधण्यात येत आहेत. एका मजल्यावर २४ ते ३६ घरे आहेत. तर घरे ३०० चौरस फुटांची १ बीएचकेची असणार आहेत. ही घरे सोसायटी सदस्य असलेल्या कामगारांना पाच लाखांत वितरीत केली जाणार आहेत. तर या प्रकल्पात चार शाळा, ४० अंगणवाड्या, दुकाने आणि इतर सुविधा असणार आहेत. तसेच येथे वनीकरण केले जाणार आहे. अशा या प्रकल्पातील ३० हजारपैकी १५ हजार घरांचे काम पूर्ण झाल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या घरांचे काम पूर्ण झाल्याने आणि लाभार्थी निश्चित असल्याने नोव्हेंबरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते १५ हजार घरांचे चावी वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण काही कारणाने चावी वाटप रखडले. आता मात्र १२ जानेवारी रोजी मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू) लोकार्पणाच्या वेळी या घरांचेही ऑनलाईन पद्धतीने चावी वाटप करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यानुसार राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. लवकरच याबाबत अंंतिम निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 thousand houses under pradhan mantri awas yojana project ready in solapur mumbai print news zws