सायन- चुनाभट्टी येथे १५ वर्षांपूर्वी चोरीच्या हेतुने झालेल्या गृहिणीच्या हत्येची उकल करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अँटॉप हिल युनिटला यश आले आहे. या गृहिणीकडे घरकाम करणाऱ्या महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांची हत्येची कबुली दिली आहे.
चुनाभट्टी येथील वृंदावन सोसायटीत राहणाऱ्या भानुमती ठक्कर यांची ऑक्टोबर १९९७ मध्ये अज्ञात इसमांनी घरात शिरून हत्या केली व सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु कुठलाही दुवा नसल्यामुळे या खुनाची उकल होऊ शकली नव्हती. अँटॉप हिल युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विनायक वस्त आणि सहायक निरीक्षक महेश तावडे आदींच्या पथकाने जुन्या प्रकरणांचा आढावा घेताना या प्रकरणाकडे लक्ष केंद्रीत केले.
घराचा दरवाजा न फोडता आरोपी आत शिरले होते. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तींचा हत्येत सहभाग असावा, असा पोलिसांचा दाट संशय होता. त्यामुळे त्यावेळी घरकाम करणाऱ्या माया पवार हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु तिच्याकडून काहीही दुवा मिळाला नाही. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मायाचा पती तानाजी पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. काही क्षणातच त्याने हत्येची कबुली दिली. संभाजी शेलार या मित्रासह हत्या केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

Story img Loader