मुंबई : गेली तब्बल १३ वर्षे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असून अधेमधे खाचखळग्यांनी भरलेला हा रस्ता प्रवासी आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. आता तर मोठय़ा प्रमाणावर होत असलेल्या अपघातांमुळे या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर जानेवारी – नोव्हेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या १२९ प्राणांतिक रस्ते अपघातात १५० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीतून उघडकीस आले आहे.
राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत वाहतूक पोलीस, परिवहन विभागाबरोबरच विविध सामाजिक संस्था सहभागी होतात. मात्र या मोहिमेनंतरही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. दारू पिऊन अथवा बेदरकारपणे वाहन चालविणे, नियम धाब्यावर बसवून अन्य वाहनांच्या पुढे जाणे इत्यादी विविध कारणांमुळे राज्यात रस्ते अपघात होत आहेत. शिवाय रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे चुकविताना अपघाताच्या घटना घडत आहेत. याला मुंबई-गोवा महामार्गही अपवाद आहे. या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात वाढले असून प्राणांतिक अपघातात मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे.
महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यांमध्ये १२९ प्राणांतिक अपघात झाले असून त्यात १५० जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये १०९ प्राणांतिक अपघातात १२३ जणांचा आणि २०२१ मध्ये ११८ प्राणांतिक अपघातात ११९ जणांना प्राण गमावावे लागले होते. गंभीर जखमींच्या संख्येतही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या वर्षांत १५२ गंभीर अपघातात ३३५ जण जखमी झाले. २०२० आणि २०२१ या वर्षांत अनुक्रमे ११५ आणि १२८ गंभीर अपघात झाले असून अनुक्रमे ३०९ आणि २८८ जण जखमी झाले आहेत. याशिवाय गेल्या ११ महिन्यांत ५४ किरकोळ अपघातात १६० जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मार्गासाठी आंदोलने..
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी अनेकदा सामाजिक राजकीय संघटनांनी आंदोलने केली. मात्र याकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील हा एकमेव महामार्ग रखडलेल्या अवस्थेत आहे. दरवर्षी पावसाळय़ात या महामार्गावरून जाताना रस्त्याची दुरवस्था आणि खड्डे यामुळे अपघात होतात. शिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागते. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे.