आग लागल्यानंतर दक्षिण मुंबई ते नवी मुंबई परिसरात पसरलेल्या धुरामुळे चर्चेचा विषय बनलेल्या देवनार कचराभूमीलगत उभ्या असलेल्या सुमारे १५० अनधिकृत झोपडय़ा पालिकेने कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुधवारी जमीनदोस्त केल्या. आणखी काही अनधिकृत झोपडय़ा शिल्लक असून त्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये देवनार कचराभूमीला खेटून आदर्श नगर, पद्मा नगर, इंदिरा नगर (शिवाजी नगर परिसरातील) उभे राहिले आहे. देवनार कचराभूमीच्या संरक्षक भिंतीला खेटून बाहेरच्या बाजूला या वस्त्यांमधून झोपडपट्टी दादांनी मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत झोपडय़ा उभारण्यात आल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आल्या होत्या. तसेच काही ठिकाणी संरक्षक भिंत तोडून बाहेरच्या बाजूला मोठे गाळे बांधण्यात आले होते. या गाळ्यांमध्ये कचरा संकलनाचे अनधिकृतपणे काम करण्यात येत होते. विकण्यायोग्य कचरा वेचून उर्वरित कचरा कचराभूमीत फेकून देण्यात येत होता. तसेच काही अनधिकृत गोदामेही येथे थाटण्यात आली आहेत. याबद्दलही पालिका अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पालिकेने बुधवारी या झोपडय़ा जमीनदोस्त केल्या.
पालिकेच्या एम-पूर्व विभाग कार्यालयाने बुधवारी सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू केली. दोन जेसीबीच्या मदतीने पालिका कामगारांनी या झोपडय़ा तोडल्या. पालिकेचे पाच वरिष्ठ अधिकारी आणि २५ कर्मचाऱ्यांनीही कारवाई केली. या वेळी तब्बल ३५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. १५० अनधिकृत झोपडय़ा आणि पाच मोठे गाळे (प्रत्येकी ३० फूट बाय १५ फूट) तोडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा