सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आणि दुर्मीळ ग्रंथसंपदा असलेले मुंबईतील सर्वात जुने ग्रंथालय म्हणून ज्याची ओळख आहे असे डेव्हिड ससून ग्रंथालय आज म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी १५१ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ज्ञानभांडाराचा ठेवा म्हणून प्रख्यात असलेल्या डेव्हिड ससून ग्रंथालयाच्या १५१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डेव्हिड ससून

१८४७ ची गोष्ट, काही तरुण मेकॅनिकांचा गट आणि रॉयल मिंट आणि सरकारी डॉकयार्डचे कर्मचारी यांच्या पुढाकारातून यांत्रिकी मॉडेल आणि स्थापत्यशास्त्राचा आराखडा याचा अभ्यास करण्यासाठी ससून मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटची स्थापना केली गेली. संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयसह या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर तत्कालिक तज्ज्ञांची व्याख्यानेही या संस्थेत होत असत. ज्ञानासंपदेचे हे भांडार म्हणजेच आजचे डेव्हिड ससून ग्रंथालय..

सुरुवातीला मेकॅनिक इन्स्टिटय़ूट ही संस्था भाडय़ाच्या जागेमध्ये सुरू होती. कालांतराने जुन्या फोर्ट भागातील भिंत पाडण्यात आल्यानंतर भाडय़ाच्या जागेमध्ये असलेल्या या संस्थेसाठी खास इमारत उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. १८६३ साली डेव्हिड ससून या लोकपरोपकारी आणि श्रीमंत व्यापाऱ्याने या इमारत बांधणीसाठी केलेली ६० हजार रुपयांची आर्थिक मदत आणि तात्कालिक सरकार यांच्या पुढाकारातून या इमारतीच्या प्रकल्पाचा पाया रचला गेला. त्यानंतर १८७० साली जेव्हा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा डेव्हिड ससून यांचा मुलगा अल्बर्ट ससून यांनी हे ग्रंथभंडार समाजासाठी खुले केले आणि डेव्हिड ससून ग्रंथालय नावारूपास आले.

मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात रॅम्पोर्ट रो येथील एल्फिन्स्टन महाविद्यालय, वॉटसन्स हॉटेल यांच्या रांगेत उभी असलेली डेव्हिड ससूनची इमारत नजर खिळवून ठेवते. इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे पाठ वळवून उभे राहिल्यास समोरच दिसणारा काळा घोडय़ाचा पुतळा जणू आपल्याकडेच दिमाखात बघत आहे, असं वाटतं. या इमारतीचा आराखडा स्कॉट मॅकलॅड अ‍ॅण्ड कंपनीने तयार केला असून वास्तुकलेची रचना जे कॅम्पबेल आणि डी. ई. गॉसलिंग यांनी केली आहे. त्या वेळी या इमारतीच्या बांधणीसाठी १ लाख २५ हजार खर्च करण्यात आला. ही संपूर्ण इमारत गॉथिक शैलीमध्ये उभारण्यात आली असून हिचे बांधकाम १८७० साली पूर्ण झाले आहे. आज ही इमारत जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. २००६ साली जगातील अप्रतिम ४७ ग्रंथालयांमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची गणना करण्यात आली आहे. तीन मजली असलेल्या इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतरच ग्रंथालयात येण्याचे आमंत्रण देणारा डेव्हिड ससून यांचा पुतळा उभारलेला आहे. पहिल्या मजल्यावर ग्रंथालय आणि वाचनालय आहे. याच भागात ग्रंथालयाच्या सदस्यांसाठी राखीव ठेवलेले खण असलेली मोठी लोखंडी कपाटे आहेत.

ग्रंथालयातील मजेशीर प्रकार म्हणजे वामकुक्षी घेण्यासाठी ठेवलेल्या आराम खुर्च्या. ग्रंथालयाच्या पहिल्या मजल्याच्या गच्चीच्या भागामध्ये ठेवण्यात आलेल्या या खुर्च्याची रचना ही समुद्रकाठी उन्हं घेत बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या मोठय़ा बाकडय़ांप्रमाणे असून हात निवांत ठेवण्यासाठी दोन्ही बाजूला पट्टय़ादेखील आहेत. या इमारतीचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे इमारतीच्या दर्शनी भागात उंचावर असलेले जुन्या काळातील भले मोठे घडय़ाळ. राजाबाई टॉवरचे घडय़ाळ रस्त्यांच्या त्या दिशेला, तर नेमक्या विरुद्ध बाजूला डेव्हिड ससून इमारतीचे घडय़ाळ. आजही या घडय़ाळ्याला सहा दिवसांतून एकदा चावी द्यावी लागते. ही चावी कशी देतात आणि हे घडय़ाळाची मागची रचना कशी आहे, याचा मागोवा घेणं हाही एक मजेशीर प्रकार आहे.

सध्याच्या घडीला ग्रंथालयामध्ये ५० हजाराहून अधिक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेची पुस्तके आहेत. यासोबतच १८ व्या आणि १९ व्या शतकातील दुर्मीळ अशा पुस्तकांचा खजिनाही ग्रंथालयामध्ये पाहण्यास मिळतो. या दुर्मीळ पुस्तकांचे तंत्रज्ञानाच्या मदतीने संगणकीय स्वरूपातही जतन करण्यात आलेले आहे. तसेच विविध भाषांची जुनी मासिकेही ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. संस्थेचे अडीच हजार आजीवन सभासद असून नव्याने येणारा विद्यार्थी वर्गही ग्रंथालयाशी जोडला जात आहे. वर्षांतील ३६५ दिवसही खुले असणारे हे ग्रंथालय आणि वाचनालय विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच आहे. संपूर्णरीत्या लोकाश्रयावर चालणाऱ्या ग्रंथालयामध्ये वाचकांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते. महिन्यातून दोन शनिवारी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. तरीही संस्थेचे वार्षिक शुल्क आजही अत्यल्प असे आहे. त्यातूनही विद्यार्थ्यांसाठी वायफायची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे, असे ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. कौशिक ओझा मोठय़ा अभिमानाने सांगतात.

एकेकाळी वाचकांची रांग लागणाऱ्या ग्रंथालयाकडे मात्र आताच्या तरुण पिढीने पाठ फिरवली आहे. आता येणारा विद्यर्थी वर्ग हा मुख्यत: परीक्षेच्या अभ्यासासाठी येतो. त्याला अवांतर वाचनाची गोडी नाही. जे काही थोडे विद्यार्थी वाचतात ते मोबाइल किंवा आयपॅडवरच पुस्तके वाचणे पसंत करत आहेत. त्यामुळे आता महिनोन्महिने बरीचशी पुस्तके कपाटातून बाहेरच आलेली नाहीत, अशी खंत डॉ. ओझा व्यक्त करतात. त्याचवेळी एकेकाळी इंग्रजी वाचकांचा ओढा असलेल्या या ग्रंथालयामध्ये आता सर्वात जास्त मागणी ही मराठी पुस्तकांना असल्याचेही ते आवर्जून सांगतात. सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी दिवसाला जवळपास दीडशे पुस्तके ग्रंथालयातून जात असतं. त्यावेळी ग्रंथालयामध्ये पुस्तके वाटपासाठी दोन कर्मचारी अपुरे पडत असत. आता दिवसाला फारतर १५ पुस्तके जातात. आता आजीवन सभासदत्व असलेले सत्तरीकडे झुकलेला वर्ग सोडला तर तरुण वर्गाचा राबता कमी प्रमाणात असतो, असे इथे गेली चाळीस वर्षे कार्यरत असलेले कर्मचारी रमेश गुरव सांगतात.

आर्थिक मदतीची गरज

कोणताही राजकीय आणि धार्मिक हस्तक्षेप टाळण्यासाठी ग्रंथालयाने कोणत्याही प्रकारचे अनुदान स्वीकारलेले नाही. त्यामुळे लोकांनी दिलेल्या आर्थिक मदतीमधूनच संस्थेचा डोलारा चालत असल्यामुळे ग्रंथालयाचा विकास करण्यासाठी कायमच अडचणी उभ्या असतात. मात्र त्यातूनही वाट काढत आम्ही ग्रंथालयाने १५१ वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. संस्थेला आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनविणे आणि ग्रंथालयाचा ज्ञानयज्ञ अखंड सुरू ठेवणे हाच आमचा ध्यास असे सांगत असताना डॉ. ओझा यांच्या बोलण्यातला उत्साह पाहिला की ग्रंथालयात प्रवेश केल्यानंतर नजरेस पडणारा डेव्हिड ससून यांचा पुतळा जणू वाचन संस्कृतीला नव्याने उजाळा मिळण्याची आशा घेऊन ग्रंथसंपदा देणारे हात पसरून उभा आहे असं वाटायला लागतं.

शैलजा तिवले Shailaja486@gmail.com

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 150 years old david sassoon library in mumbai