मुंबई : गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. मराठवाडयात जेमतेम ३१ टक्के जलसाठा उपलब्ध असून आजमितीस दीड हजार गाव- वाडयांमध्ये ५११ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच काळात केवळ पालघर तालुक्यातील दोन वाडयांमध्येच दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात गेल्या वर्षी जानेवारी अखेर पालघर तालुक्यातील तीन आदिवासी पाडयांमध्ये टँकरने पाणीपरवठा करावा लागला होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्यामुळे छोटे छोटे जलस्त्रोत आटू लागले असून धरणांमधील पाणीसाठयातही घट होऊ लागली आहे. थंडीमुळे पिकांसाठी पाण्याची मागणी गेले महिनाभर कमी असली तरी आता थंडी कमी होऊ लागल्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात छोटे नाले, नदीपात्रातील जलस्त्रोत बंद होऊ लागल्याने टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.

हेही वाचा >>> दीड वर्षांत २४ हजार पोलीस भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी

टँकरग्रस्त गावे, वाडया

* राज्यात ४५६ गावे, १०८७ वाडयांमध्ये सध्या ५११ टँकरने पाणी पुरवठा. यांपैकी केवळ ४७ टँकर शासकीय उर्वरित खासगी. 

* सर्वाधिक धरणे असलेल्या नाशिक जिल्ह्यातच सर्वाधिक १२८ गावे व २५५ वाडयांमध्ये १२३ टँकरने पाणीपुरवठा.

* छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ११० गाव-वाडयांमध्ये १०५ टँकरने पाणीपुरवठा.

* सातारा जिल्ह्यात ४०, सांगली जिल्ह्यात ४३ टँकरने पाणीपुरवठा, जिल्ह्यांत टँकरची वाढती मागणी.

विभागवार जलसाठा..

नागपूर विभागातील विविध धरणांमध्ये ६२ टक्के, अमरावती विभागात ६५ टक्के, नाशिस विभागात ५८ टक्के, पुणे विभागात ५६ चक्के तर कोकणातील विविध धरणांमध्ये ६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. राज्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईचा विचार करून आतापासूनच युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1500 villages in maharashtra face drinking water crisis zws
Show comments