मुंबई : नवी मुंबई, मानखुर्द, मुंब्रा, दारूखाना येथे मुंबई पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईत १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये ९ महिला व सात पुरूषांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. प्रविण मुंढे यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी १४ पोलीस पथके तयार केली होती. त्यांनी ही कारवाई केली.
डोंगरी पोलीस ठाण्यात दोन बांगलादेशी घुसखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास केला असता मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात मोठ्याप्रमाणात बांगलादेशी घुसखोर वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली होती. त्याचा तपास करण्यासाठी १४ पोलीस पथके तयार करण्यात आली. त्यांनी मानखुर्द, वाशीनाका, कळंबोली, पनवेल, कोपर खैराणे, कल्याण, मुंब्रा, दारूखाना येथून १६ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यात नऊ महिला व सात पुरूषांचा समावेश आहे. याशिवाय यापूर्वी दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यांना त्यावेळी नोटीस देण्यात आली होती.
बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मुंबई पोलिसांसह इतर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी पोलिसांच्या या कारवाईत अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्या बनावट कागदपत्रांवरून या बांगलादेशी नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान केल्याचे देखील उघड झाले होते. याशिवाय अनेकांनी भारतीय नागरिक असल्याची कागदपत्रे तयार केल्याचेही तपासात उघड झाले होते.