राज्यभरात गाजलेल्या आदर्श घोटाळ्याच्या फाइल गायब होण्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका घोटाळ्याशी सबंधित फायली गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ठाणे परिवहनमध्ये गाजलेल्या बस बांधणी घोटाळ्याचा खटला सध्या ठाणे न्यायालयात सुरू असून त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या फाईल कशा गायब झाल्या, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने(टीएमटी) १९९३ मध्ये ३० बसेस खरेदी केल्या होत्या. या बसची बांधणी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असता १० कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. मात्र त्यातील सर्वात कमी दराच्या निविदाकाराला हे काम देण्याऐवजी भारती बिल्ट, इनकोच आणि स्टार लाइन तीन कंपन्यांना विभागून हे काम देण्याचा निर्णय प्रशासन तसेच परिवहन समितीने घेतला. त्यामुळे या प्रकरणात परिवहनचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत परिवहन समिती सदस्य आणि परिहवन व्यवस्थापक व काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर या सर्वाविरोधात न्यायालायत खटला चालविण्यासाठी परिवहन समितीकडे मंजुरी मागण्यात आली. मात्र या घोटाळ्यातील बडय़ा राजकीय व्यक्तींमुळे परिवहन समितीने खटला दाखल करण्यास अनुमती नाकाराली. त्यानंतर या प्रकरणात हस्तक्षेप करीत महापालिका आयुक्तांनी खटला दाखल करण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश राज्य शासनाने दिले.
त्यानुसार तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी या घोटाळ्यात खटला दाखल करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागास परवानगी दिली. तब्बल २८ वर्षांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयात हा खटला सुनावणीस आला असून टी. चंद्रशेखर यांच्या साक्षीदरम्यान या प्रकरणाच्या १६ फाइल गायब झाल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर या फाइल कशा आणि कुणामुळे गायब झाल्या, त्याला जबाबदार लोकांवर काय कारवाई केली, अशी विचारणा न्यायालयाने केली असून ११ डिसेंबरपूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने परिवहन व्यवस्थापकाना दिले आहेत.
मात्र चौकशी दरम्यान या सर्व फाइल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घ्ेातल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडूनच गायब झाल्याची चर्चाही ऐकावयास मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा