मुंबई: सागरी किनारा मार्ग प्रकल्पाअंतर्गत १६ ठिकाणी पूर प्रतिबंधक दरवाजे उभारण्याचे काम येत्या एप्रिलअखेरीस पूर्ण होणार आहे. हे पूर प्रतिबंधक दरवाजे स्वयंचलित असून त्याची नुकतीच चाचणी पूर्ण झाली आहे. पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरू नये म्हणून हे दरवाजे बसवण्यात येत आहेत. हे पूर प्रतिबंधक दरवाजे येत्या पावसाळ्यात कार्यान्वित होणार आहेत.
सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गालगत १११ हेक्टरचा भराव घालण्यात येणार आहे. भराव घालण्यात येणार असल्यामुळे समुद्राचे पाणी शहरात शिरेल का अशी शंका नेहमी उपस्थित करण्यात येते. मात्र या प्रकल्पाचे काम करीत असताना पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यात आली असून सागरी किनारा मार्गालगत १६ ठिकाणी स्वयंचलित प्रतिबंधक दरवाजे उभारण्यात येणार आहेत. त्याची चाचणी नुकतीच पूर्ण झाली असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हे स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल – वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किमी लांबीचा हा सागरी किनारा मार्ग आहे. समुद्राला लागून असलेल्या या मार्गाचे बांधकाम करताना समुद्राकडे जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. पावसाळ्यात मुंबईत साचणारे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून समुद्रात सोडले जाते. सागरी किनारा मार्गाअंतर्गत १६ पर्जन्य जलवाहिन्यांचा समावेश असून या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी ११६ हेक्टरचा भराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे जी जमिन निर्माण होईल त्यात साचणाऱ्या पाण्याचाही निचरा व्हावा याचाही विचार या पर्जन्य जलवाहिन्यांचे बांधकाम करताना करण्यात आला आहे. मुंबईतील ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मिमी पावसाच्या पाण्याचा निचरा करू शकेल इतकी आहे. तर ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत ही क्षमता ताशी ६० मिमी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याइतकी करण्यात आली आहे. मात्र सागरी किनारा मार्गाच्या पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता ही ताशी ९० मिमि पावसाच्या पाण्याचा निचरा करता येईल इतकी आहे. तसेच पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी सध्या असलेली ब्रिटिशकालीन पातमुखे ही समुद्र सपाटीच्या खाली आहेत. तर नव्याने बांधलेल्या पर्जन्य जलवाहिन्या व पातमुखे ही समुद्र सपाटीपासून उंच आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात येण्याचा धोका टळेल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला.
क्षमतेत वाढ
पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे. मात्र अतिवृष्टीच्या वेळी समुद्राला भरती आल्यानंतर समुद्राचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून शहरात शिरते. त्यामुळे या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये १६ ठिकाणी पूर प्रतिबंधक दरवाजे उभारण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे दरवाजे स्वयंचलित आणि मानवी पद्धतीने उघडता व बंद करता येतील असे आहेत. भरतीच्या वेळी हे दरवाजे बंद केल्यास समुद्राचे पाणी शहरात शिरू शकणार नाही. मात्र हे दरवाजे बसवण्याचे काम पुढील पावसाळ्यात पूर्ण होणार आहे.