लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईला भेटून घरी जाणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाचा नागपाडा परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मृत मुलगा दुचाकीच्या मागे बसला होता. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात नागपाडा पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागपाडा येथून आग्रीपाडा परिसरात जाणाऱ्या वाय पुलावर हा अपघात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हुध अन्सारीच्या आईच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शनिवारी आग्रीपाडा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना हुध रुग्णालयात उपस्थित होता. यावेळी त्याचे कुटुंबियल आणि इतर नातेवाईकही तेथे आले होते. रात्री दीड वाजता त्यांनी अब्दुलला हुधला घरी जाऊन जेवण करून येण्यास सांगितले. आतेभाऊ अब्दुल बरोबर हुध त्याच्या मोटरसायकलवरून घरी जाण्यासाठी निघाला. मोटरसायकल वाय ब्रिजवरून जात असताना अब्दुलने हलर्जीपणाने भरधाव वेगात मोटरसायकल चालवून पुढे जाणार्या एका दुचाकीला धडक दिली.
आणखी वाचा-कुलाब्यातील प्रकल्पाला पालिकेची स्थगिती?
या अपघातात त्याच्या मागे बसलेला हुध अन्सारी गंभीररित्या जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण रविवारी पहाटे ४ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. ही माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबियांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी अब्दुल वदुद अन्सारी याच्याविरुद्ध नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आणखी वाचा-फडणवीसच; पण गृह कोणाकडे? एकनाथ शिंदे मुंबईत परतल्याने खातेवाटपाची चर्चा आजपासून
नागपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार अमित सपाटे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१ सह मोटरवाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुधच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.