मुंबईतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पुद्दुचेरी येथे लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. पुद्दुचेरी येथील एका रिक्षाचालकाने सदर मुलीवर बलात्कार केला आणि तिला दुसऱ्या दिवशी समुद्रकिनारी सोडले. तिथे चेन्नईतील सहा मुलांनी तिला विश्वासात घेऊन हॉटेलवर नेले आणि आळीपाळीने बलात्कार केला. अखेर तिची सुटका झाल्यानंतर समुद्रकिनारी अतिशय वाईट अवस्थेत ती आढळून आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पुद्दुचेरी पोलिसांनी यानंतर रिक्षाचालक आरोपी काजा मोहिद्दीन याला विलूपुरम जिल्ह्यातून ताब्यात घेतले. तर चेन्नईतील सहा मुलांपैकी तिघांना अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईशी भांडण आणि नराधमांचा अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह पुद्दुचेरी येथे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आली होती. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आईशी भांडण झाल्यानंतर ती घराबाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर तिने मोहिद्दीनची रिक्षा पकडली आणि एखाद्या पर्यटनस्थळी घेऊन जाण्यास सांगितले. आरोपी मोहिद्दीनने मुलीला पर्यटनस्थळी नेण्याऐवजी स्वतःच्या घरी नेले. तिथे तिला मद्य पिण्यास देऊन लैंगिक अत्याचार केले. टाइम्स ऑफ इंडियाने सदर वृत्त दिले आहे.

रात्रभर अत्याचार केल्यानंतर आरोपी रिक्षाचालकाने पीडित मुलीला सकाळी ऑरोविल याठिकाणी सोडले आणि तिथून पळ काढला. यानंतर पीडिता सेरेनिटी समुद्रकिनारी बसली असताना चेन्नईतील एका टेक कंपनीत काम करणाऱ्या सहा तरूणांची तिच्यावर नजर पडली. या तरूणांनी तिच्याशी मैत्री केली. यावेळी पीडित मुलीने चेन्नईला मित्राच्या घरी जायचे असल्याचे सांगितले. या मुलांनी तिला चेन्नईला सोडण्याचे आश्वासन देऊन स्वतःच्या हॉटेलवरील रुमवर नेले. हॉटेलच्या रुमवर तिला मद्य पिण्यास देऊन सहा जणांनी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी एका टॅक्सीतून तिला पुन्हा पुद्दुचेरी येथे सोडले.

हे वाचा >> गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’

पोलिसांकडून उरलेल्या आरोपींचा शोध सुरू

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पीडितेच्या आईने ग्रँड बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुद्दुचेरी येथील बिच रोडवर मुलगी दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. त्यावेळी पीडित मुलीची अवस्था अतिशय वाईट होती आणि तिला काहीही बोलता येत नव्हते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाल विकास समितीच्या सदस्यांनी तिला विश्वासात घेऊन प्राथमिक चौकशी सुरू केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिद्दीनने मुलीला मारहाण करून स्वतःच्या घरी नेले होते. मोहिद्दीन सध्या अटकेत असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या आधारावर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 year old mumbai girl raped by auto driver and six techies in puducherry