मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणात पोलिसांनी १,६०० पानांचे आरोपपत्र वांद्रे न्यायालयात सादर केले आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम विरोधातील या आरोपपत्रात अभिनेत्री करिना कपूरसह ३५ साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश आहे. याशिवाय ओळख परेड अहवाल तसेच विविध न्यायवैद्यक अहवालांचा समावेश या आरोपपत्रात आहे.
आरोपी मोहम्मद शरिफुल १६ जानेवारीला इमारतीतील जिन्यावरून आला व सैफचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. त्या वेळी घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा या सैफचा मुलगा जहांगीरला उचण्यासाठी धावल्या असता, आरोपीने त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्या वेळी सैफ व करीना दोघेही तेथे पोहोचले. त्या वेळी हल्लेखोराने चाकूने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया गीता या देखील मध्ये पडल्या. आरोपीच्या हल्ल्यात त्याही जखमी झाल्या.
आरोपीला १९ जानेवारीला ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी १,६०० पानांचे आरोपपत्र वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात जमा केले आहे. त्यात पोलिसांव्यतिरिक्त ३५ साक्षीदारांचे जबाबही आहेत. याशिवाय ओळख परेडमध्ये लिमा व गीता यांनी आरोपीला ओळखले होते. त्याबाबतचा अहवाल व बोटांच्या ठशांचा अहवाल तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण व आरोपीचा चेहरा यांची न्यायवैद्यक पडताळणी करण्यात आली होती. त्याचा अहवालही या आरोपपत्राचा भाग आहे.
सीसीटीव्हीतील आरोपी व अटक करण्यात आलेला शरिफुल यांच्या छायाचित्राची पडताळणी करण्यात आली होती. त्यात सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती शरिफुल असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ३०० सीसीटीव्ही चित्रीकरण पाठवण्यात आले होते. त्यातील २५ सीसीटीव्ही चित्रीकरणाचा अहवाल होकारार्थी आला आहे.
तांत्रिक पुराव्यावरून हल्लेखोर स्पष्ट
– आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे हा या आरोपपत्राचा भाग आहे. त्यात बांगलादेशी नागरिक असल्याचे ओळखपत्र व चालक परवानाही पुरावा म्हणून आरोपपत्रात सहभागी करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी आरोपीच्या हातात चाकू आणि काठी होती. तसेच त्याने नर्स फिलीप यांच्याकडे एक कोटी रुपये देण्याची मागणी केली.
– हल्ल्यात वापरण्यात आलेल्या चाकूचा पंचनामा व इतर गोष्टींचा समावेशही या आरोपपत्रात आहे. पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. याशिवाय सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाईल लोकेशन असे तांत्रिक पुराव्यावरून शरिफुलच सैफवर हल्ला करणारा व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.