उद्घाटनाला फडणवीस, तर समारोपाला तावडे

कोकण मराठी साहित्य परिषदेचे १६ वे साहित्य संमेलन मुंबईत दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. आमदार आणि ‘भाजप’च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष अॅड. आशीष शेलार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून नाटककार जयंत पवार हे संमेलनाध्यक्ष आहेत. तीन दिवसांच्या संमेलनात महाचर्चा, परिसंवाद काव्य संमेलन, अभिवाचन, साहित्य दिंडी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटक म्हणून येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून संमेलनाचा समारोप सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी जयंत पवार, अॅड. शेलार आणि ‘कोमसाप’चे पदाधिकारी उपस्थित होते.
२० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिरापासून ग्रंथपालखी/िदडी काढण्यात येणार आहे. संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते तर कला दालनाचे उद्घाटन सारस्वत बॅकेचे संचालक किशोर रांगणेकर यांच्या हस्तेहोणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. ‘कोमसाप’च्या नाटय़ लेखन स्पर्धेतील विजेते किरण येले यांना पुरस्कार वितरण, ‘प्रसार माध्यमे दिवसेंदिवस अधिक हिंसक होत आहेत का?’ हा परिसंवाद असे विविध कार्यक्रम होणार असल्याचे डॉ. केळुस्कर यांनी सांगितले.

माझी नाळ अद्यापही कोकणाशी जुळलेली असून ‘कोमसाप’च्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद हा माझ्यासाठी बहुमान आहे. मुंबईत होणाऱ्या ‘कोमसाप’च्या पहिल्या संमेलनाचा ‘पालक’ अशी भूमिका माझी राहणार असून ‘कमी असेल तिथे मी’ या भावनेतून संमेलनाला सर्वतोपरी मदत करणार आहे.
– अॅड. आशीष शेलार, आमदार

Story img Loader