मुंबईमध्ये एकापेक्षा अधिक औषधांना न बधणाऱ्या (मल्टी ड्रग्स रेसिस्टंट – एमडीआर) क्षयाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच; रुग्णांचा शोध, त्यांच्यापर्यंत औषधे पोहोचविणे, नियमितपणे ते औषधे घेतात का, रुग्णांपर्यंत पोषण आहार पोहोचविणे, कंत्राटी कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचतात का, त्यांना औषधे देतात का, खासगी डॉक्टरांशी समन्वय आदींसाठी विणलेले जाळे कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. क्षयग्रस्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यंत्रणा उभारणाऱ्या तब्बल १७ जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याने त्याचा थेट फटका रुग्णांना बसणार आहे. औषधोपचारात खंड पडल्यास रुग्ण दगावू शकतात, पण पालिका प्रशासन त्याचा विचारच करण्यास तयार नाही.
मुंबईमध्ये जानेवारी २०१२ मध्ये एमडीआर क्षयाचे रुग्ण आढळून आल्यानंतर युद्धपातळीवर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम हाती घेण्यात आला. मुंबईत २०१० मध्ये केवळ ५३ एमडीआर रुग्ण होते. डिसेंबर २०१४ मध्ये या रुग्णांची संख्या अनुक्रमे ३,५३० वर पोहोचली. परिणामी क्षय निदान व्यवस्था बळकट करण्यासाठी यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले. त्याचबरोबर मनुष्यबळही वाढविण्यात आले. रुग्ण शोधून त्यांच्याशी सातत्याने संपर्क राहावा यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची फौजही उभी करण्यात आली. प्रत्यक्ष रुग्णांशी, कंत्राटी कर्मचाऱ्यांशी संपर्कात राहून डॉक्टरांशी समन्वय साधणे, तसेच औषधाचा साठा मिळविणे तो रुग्णांपर्यंत पोहोचविणे आदी अनेक कामासाठी मुंबईतील २४ जिल्ह्य़ांमध्ये २४ जिल्हा जिल्हा क्षयरोग अधिकारी पदावर डॉक्टरांच्या नियुक्तया करण्यात आल्या. ही डॉक्टर मंडळी त्यांच्या त्यांच्या विभागांमध्ये कार्यरत असून वस्त्या, चाळी, सोसायटय़ांमधील घराघरात पोहोचली आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घरोघरी फिरून शोधलेल्या रुग्णांनी योग्य तो आहार आणि उपचार घ्यावेत यासाठी हे डॉक्टर सतत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्क साधून आहेत. कर्मचारी आपली कामगिरी चौख बजावतात की नाही यावरही त्यांना लक्ष ठेवावे लागते. कर्मचारी सतत विभागात फिरत असल्याने त्यांच्याशी सातत्याने समन्वय साधावा लागतो. आपल्या विभागातील रुग्णांसाठी पुरेशी औषधे उपलब्ध आहेत की नाहीत, उपलब्ध औषधे रुग्णांपर्यंत पोहोचतात का, ते औषधे घेतात का यावर या डॉक्टरांना बारकाईने लक्ष ठेवावे लागते. आता या रुग्णांपर्यंत पोषण आहार पोहोचविण्याची कामगिरीही या डॉक्टरांना फत्ते पाडावी लागत आहे. आजघडीला ३१ हजारांहून अधिक क्षयग्रस्त रुग्ण पालिकेच्या यंत्रणेमार्फत उपचार घेत असून एमडीआर रुग्णांची संख्या पाच हजारांच्या वर पोहोचली आहे. अनेक रुग्ण औषधे घेण्यासाठी पालिकेच्या दवाखान्यात येण्यास तयार होत नाहीत. मग त्यांची औषधे त्यांच्या खासगी डॉक्टरच्या दवाखान्यात ठेवावी लागतात. त्यासाठी संबंधित डॉक्टरांशी समन्वय साधण्याचे कामही जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांना करावे लागते. काही वेळा खासगी डॉक्टर तयार होत नाहीत. मग त्यांची मनधरणी करावी लागते. या सर्व कामांसाठी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी आपले जाळे तयार केले आहे.
क्षयाच्या उच्चाटनासाठी उभारलेले जाळे विस्कटण्याची चिन्हे
मुंबईमध्ये एकापेक्षा अधिक औषधांना न बधणाऱ्या (मल्टी ड्रग्स रेसिस्टंट - एमडीआर) क्षयाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच; रुग्णांचा शोध, त्यांच्यापर्यंत औषधे पोहोचविणे,
First published on: 23-04-2015 at 09:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 district tb officer transferred