मुंबई: वडाळा येथे अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपीला वडाळा पोलिसांनी सोमवारी रंगेहात पकडले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे ८५ लाख रुपये किमतीचे १७ किलो चरस मिळाले. आरोपी जाहिद टिपू सुलतान खान (२८) याला अटक करण्यात आली आहे.
वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वडाळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती दुचाकीवरून येताना दिसताच त्याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. तसेच दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून १६.९८३ किलो इतक्या वजनाचे चरस सापडले. वडाळा पोलीस ठाण्यात कलम ८ (क), २०(क) सह २९ एनडीपीएस अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी जाहिद टिपू सुलतान खान याला अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.