अभिनेता शाहरुख खान याच्या ५८ व्या वाढदिवसांला वांद्रे येथील मन्नत या निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली असताना या गर्दीत चोरटेही मोठ्याप्रमाणात सक्रिय होते. यावेळी १७ मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या असून त्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी प्रमाणे, बांद्रा (पश्चिम) येथील बँड स्टँड येथील मन्नत या खानच्या बंगल्याबाहेर शेकडो चाहते जमा झाले होते. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी बुधवारी मध्यरात्री चाहत्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. कोणताही अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मोठ्याप्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण तरीही चोरट्यांनी १७ मोबाईलची चोरी केली.

हेही वाचा >>> सनी देओलला आवडत नाही शाहरुख अन् अक्षय कुमारची ‘ही’ गोष्ट; खुलासा करत म्हणाला…

सांताक्रूझचा रहिवासी असलेला अरबाज खान(२३) त्याच्या मित्रांसह बँड स्टँडवर अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी आला होता. बुधवारी मध्यरात्री अभिनेता खान त्याच्या घरातून बाहेर आला, त्याने त्याच्या विशिष्ट शैलीमध्ये उभा राहून चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर काही वेळाने अरबाजने पाहिले असता त्याच्या खिशात मोबाईल नव्हता. त्याने आजुबाजूला चौकशी केली. पण मोबाईल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुखच्या आणखी १६ चाहत्यांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. लोअर परळ येथील व्यापारी निखिल भट्ट (२४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या वाढदिवसाला मोबाईल चोरी झाल्याची ही पहिली वेळ नसून २०२२ मध्ये ११ चाहत्यांनी मोबाईल फोन गमावले होते. त्यापूर्वी २०१९ मध्ये दोन चाहत्यांचे मोबाईल चोरीला गेले होते. २०१७ मध्ये १३ मोबाईलची चोरी झाली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 mobile phones of fans stolen on actor shah rukh khan birthday mumbai print news zws