‘आयएनएस सिंधुरत्न’ या पाणबुडीवरील दुर्घटनेनंतर थेट नौदलप्रमुखांवरच राजीनामा देण्याची नामुष्की आली. वास्तविक नौदलप्रमुखांनी आयुष्यमान संपलेल्या पाणबुडय़ा आणि युद्धनौकांचा मुद्दा आपल्या कार्यकाळात लावून धरला होता. हाती असलेल्या माहितीनुसार आक्रमणाची धुरा सांभाळणाऱ्या आघाडीच्या ४१ युद्धनौकांपैकी १७ युद्धनौकांचे आयुष्यमान संपलेले आहे. तर ७ युद्धनौकांचे आयुष्यमान संपण्याच्या बेतात आले आहे. तर शिल्लक राहिलेल्या १४ पाणबुडय़ांपैकी आठांचे आयुष्यमान संपलेले आहे. तर उर्वरित चारांचे संपण्याच्या बेतात आहे. केवळ २ पाणबुडय़ा ‘नव्या कोऱ्या’ आहेत. विमानवाहू युद्धनौकांच्या बाबतीत तर आपण ५० वर्षांहून अधिक काळ युद्धनौका वापरण्याचा विश्वविक्रमच केला आहे.
पाणबुडय़ांच्या बाबतीत वर्षभरापूर्वी दाखल झालेली आयएनएस चक्र वगळता आणखी दोन पाणबुडय़ा अगदी तरुण म्हणजे २ वर्षांच्या आहेत. चार पाणबुडय़ांचे आयुष्यमान संपत आले आहे. तर सिंधुघोष, सिंधुध्वज, सिंधुराज, सिंधुवीर, अपघातग्रस्त सिंधुरत्न, सिंधुकेसरी यांनी त्यांची आयुर्मर्यादा ओलांडलेली आहे. सिंधुकीर्ती आणि सिंधुविजय येत्या दोन वर्षांत त्या कमाल आयुर्मर्यादेपर्यंत पोहोचतील. शिशुमार वर्गातील पाणुबडय़ांमध्ये शिशुमार व शंकुश २८ वर्षे वापरात आहेत. तर शल्की आणि शंकुल अनुक्रमे २२ व २० वर्षे वापरात आहेत.
विनाशिका वर्गातील युद्धनौका आक्रमणाची धार मानल्या जातात. त्यातील राजपूत वर्गातील रजपूत, राणा, रणजित, रणवीर आणि रणविजय यांनी २५ची आयुर्मर्यादा पार केली आहे. त्यातील पहिल्या तीन तर अनुक्रमे ३४, ३२ आणि ३१ वर्षे वापरात आहेत. दिल्ली वर्गातील विनाशिका तुलनेने तरुण आहेत. यातील दिल्ली व मुंबई अनुक्रमे १६ व १३ वर्षे वापरात आहेत. तर आयएनएस म्हैसूर मात्र २१ वर्षे वापरात आहे.
कॉव्र्हेट्स या प्रकारातील युद्धनौकांमध्ये कुकरी वर्गातील कृपाण, कुठार, खंजर आणि कुक्री या अनुक्रमे २३, २४, २३ आणि २५ वर्षे वापरातील आहेत. तर कोरा वर्गातील चार युद्धनौका या सरासरी १३ वर्षे वापरातील आहेत. वीर वर्गातील वीर, निर्भिक, निपा:त, निशंक, निर्घट, यांनी आयुर्मर्यादा पार केली आहे. तर विभूती, विपुल, विनाश आयुर्मर्यादेजवळ पोहोचल्या आहेत. अभय वर्गातील चार युद्धनौकांचे आयुष्यही आता संपत आले आहे. या साऱ्याची गोळाबेरीज केली तर असे लक्षात येते की, आक्रमणाची धुरा असलेल्या ४१ युद्धनौकांपैकी एक युद्धनौका पन्नाशी पार केलेली तर २५ वर्षांचे वय पार केलेल्या १६ युद्धनौका आहेत. तर ७ नौकांचे आयुष्य संपण्याच्या जवळ आले आहे. केवळ १८ युद्धनौका तरुण म्हणाव्यात अशा आहेत. यामुळेच आता नौदलाचे ‘वय झाल्या’ची चर्चा सध्या जोर धरते आहे. आपल्या राजीनाम्यापूर्वी नौदलप्रमुखांनी हाच मुद्दा संरक्षणमंत्र्यांकडे लावून धरला होता. मात्र संरक्षणमंत्री त्यावर मूग गिळून स्वस्थ बसले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा