मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा सध्या केवळ १६.९७ टक्क्यांवर आला आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी आहे. मात्र राज्य सरकारने राखीव साठा वापरण्यास परवानगी दिल्यामुळे जूनअखेरीपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. मात्र तरीही पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासाठी पालिका प्रशासनाने मंगळवारी एका आढावा बैठकीचे आयोजन केले असून त्यात पाणी कपात करण्याची आवश्यकता आहे का यावरही चर्चा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून २ लाख ४५ हजार ६७० दशलक्षलीटर म्हणजेच १६.९७ टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार पुढील दोन महिने हा पाणीसाठा पुरेल इतकाच आहे. पालिकेच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी मुंबईकरांची तीन दिवसांची मागणी पूर्ण करते. म्हणजेच महिन्याला सुमारे १२ ते १३ टक्के पाण्याचा वापर होतो. मात्र उन्हाच्या झळा बसू लागल्या असून उन्हामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफही होते असते. तसेच जूनमध्ये पावसाला पुरेशी सुरूवात होत नाही. त्यामुळे हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरवावे लागणार आहे. गेल्यावर्षी २०२३ मध्ये ६ मे रोजी पाणीसाठा २२ टक्के होता तर त्याआधीच्या वर्षी पाणीसाठा २६ टक्के होता.

हेही वाचा – वडिलांच्या प्रचारात व्यग्र असल्याने उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ द्या, नितेश राणेंची उच्च न्यायालयात मागणी

पाणीसाठा ५० टक्क्यांवर आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे भातसा आणि उर्ध्व वैतरणा या धरणातील राखीव पाणीसाठा मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार यंदाही भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर तर वैतरणा धरणातून ९२.५ दशलक्षलिटर राखीव साठ्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला राज्य सरकारने मंजूरी दिल्यामुळे पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली १० टक्के पाणी कपात फेब्रुवारी महिन्यात मागे घेण्यात आली होती. सध्याचा पाणीसाठा संपल्यानंतर राखीव साठ्यातील पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. हा पाणीसाठा पुरेसा आहे. मात्र प्रचंड उन्हामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाफ होत असून त्यामुळे पाणीसाठा खालावतो आहे का याचाही आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.

हेही वाचा – कॅनरा बॅंक कर्ज घोटाळा प्रकरण : नरेश गोयल यांना दोन महिन्यांचा अंतरिम वैद्यकीय जामीन

वर्ष ….पाणीसाठा …टक्केवारी

६ मे २०२४ ….. २ लाख ४५ हजार ६७० दशलक्षलीटर ….. १६.८७ टक्के

६ मे २०२३….. ३ लाख २७ हजार ४५७ दशलक्षलीटर ……२२.६२ टक्के

६ मे २०२२…… ३ लाख ७७ हजार ५५२ दशलक्षलीटार ……२६.०९ टक्के

अनेक भागांत सोमवार पाणीबाणी

मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्यामुळे सोमवारी पालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडली. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांत १० ते २० टक्के पाणी कपात करण्यात आली. संपूर्ण पश्चिम उपनगरे, तसेच शहर विभागातील वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, कुलाबा, चर्चगेट येथील पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात आली. पूर्व उपनगरे, तसेच शहर विभागातील वडाळा, नायगाव, शिवडी, लालबाग, परळ येथे २० टक्के पाणीकपात करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 percent stock in dams that supply water to mumbai municipal administration will review on tuesday mumbai print news ssb
Show comments