लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि विशेष रेल्वेमध्ये प्रभावीपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत असून २०२२-२३ या वर्षात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २५ लाख ६३ हजार प्रवाशांकडून १७०.३५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी ४३.०७ कोटी रुपये दंड मुंबई विभागातील प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे.
अधिकृत तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी पथक कार्यरत आहे. या पथकाने २०२१-२२ मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून ११३.५७ कोटी दंड वसूल केला होता. तर, २०२२-२३ मध्ये २५.६३ लाख विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १७०.३५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा… मुंबई: चित्रफीत वायरल करण्याची धमकी देऊन कलाकार तरूणीकडून २३ लाखांची खंडणी उकळली
हेही वाचा… मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांची आरक्षण शुल्कातील सवलत रद्द
मार्च २०२३ मध्ये लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील मालडब्यातून आरक्षण न करता सामानाची ने-आण करणाऱ्या, तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या एकूण १.९४ लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १२.०७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, तिकीट तपासनीसांच्या विशेष पथकाने मार्च २०२३ मध्ये मुंबई विभागातून ३.०८ कोटी दंड वसूल केला. तर, एप्रिल २०२२ पासून ते आतापर्यंत वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४८ हजार ६९१ हून अधिक प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली