पालिकेने मालाड येथे सुरू केलेल्या प्राण्यांच्या दहनभट्टीत गेल्या महिन्याभरात १७१ लहान प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये भटक्या प्राण्यांबरोबरच पाळीव प्राण्यांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांनी मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगरात पाळीव लहान प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या महिन्यात या दहनभट्टीचे लोकार्पण करण्यात आले होते. महिन्याभरात या दहनभट्टीला प्राणीमित्रांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या महिन्याभरात १७१ प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यात भटके कुत्रे, मांजरी, पाळीव कुत्रे आणि कासव, पक्षी, ससा अशा प्राण्यांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> चेंबूरमधील बंद केलेल्या सिमेंट प्रकल्पाला पुन्हा परवानगी दिल्याने रहिवासी संतप्त
मालाड पश्चिमेला कोंडवाडा (एव्हरशाईन नगर) येथील केटल पाँड कार्यालय येथे ५० किलो क्षमतेची पीएनजीवर आधारित ही दहन व्यवस्था आहे. नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित हे दहन होणार असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. पीएनजीवर आधारीत देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. नैसर्गिक वायू आधारित दहन तंत्रज्ञानाची ही पद्धती शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक देखील आहे. ही सेवा विनामूल्य आहे.
या दहन व्यवस्थेच्या संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८८७३८-८७३६४ असा आहे. पाळीव प्राणी (श्वान) असल्यास मुंबई महानगरपालिकेची श्वान अनुज्ञाप्ती आवश्यक आहे.
अंत्यसंस्कार करण्यात आलेले प्राणी
पाळीव कुत्रे ….. १३
भटके कुत्रे …. १०५
भटक्या मांजरी …..५०
पक्षी .. एक
कासव … एक
ससा … एक