मुंबई : राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) कारशेडसाठी ठाण्यामधील मोघरपाड्यातील १७४.०१ हेक्टर जागा  हस्तांतरित केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे. येत्या तीन-चार दिवसांत एमएमआरडीए जागेचा ताबा घेईल. यामुळे मोघरपाडा कारशेडच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘वडाळा – कासारवडवली मेट्रो ४’, ‘कासारवडवली – गायमुख मेट्रो ४ अ’, ‘गायमुख – शिवाजी चौक (मीरारोड)’ आणि ‘वडाळा – सीएसएमटी मेट्रो ११’ मार्गिकांसाठी ठाण्यात एकात्मिक कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएने मोघरपाडा येथील १७४.०१ हेक्टर जागा निश्चित केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. या जागेवर आपण शेती करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ती देण्यास नकार दिला होता. यावरून बराच वादही झाला.

हेही वाचा >>> शिक्षक बदली घोटाळा दडपण्याचा प्रयत्न? शासनाच्या आदेशानंतरही चौकशी नाही

अखेर हा वाद मिटविण्यात एमएमआरडीएला यश आले. आता ही जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविला असून या संबंधीचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या अटीवर ही जागा हस्तांतरित करण्यात आली. त्यानुसार १६७ शेतकऱ्यांना त्यांच्या भूखंडाच्या २२ टक्के विकसित भूखंड मोबदला म्हणून देण्यात येणार आहे. अतिक्रमित जागेवरील ३१ शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण भूखंडाच्या १२ टक्के विकसित भूखंड मोबदला म्हणून देण्यात येणार आहे. दरम्यान, आता ही जागा विनामोबदला हस्तांतरित झाल्याने तीन-चार दिवसांत एमएमआरडीए जागेचा ताबा घेणार आहे. या जागेवर एकात्मिक कारशेड उभारण्याच्या कामाचे कंत्राट महिन्याभरापूर्वीच कार्यकारी समितीच्या बैठकीत अंतिम करण्यात आले आहे. त्यामुळे आता कारशेडच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 174 01 hectare land of mogharpada carshed transferred from state government to mmrda mumbai print news ysh
Show comments