लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींपैकी यंदा २० इमारती अतिधोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट आहेत. या इमारतीतील ४१२ घरे रिकामी करुन घेण्याचे आव्हान म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळासमोर होते. त्यानुसार ४१२ पैकी २०० हून अधिक घरे रिकामी झाले आहेत. मात्र अजूनही १७६ कुटुंबे अतिधोकादायक इमारतीत वास्तव्यास असून शक्य तितक्या लवकर या कुटुंबांना संक्रमण शिबिरात किंवा इतरत्र स्थलांतरीत करण्यासाठी दुरूस्ती मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत.

उपकरप्राप्त इमारती जीर्ण झाल्या असून सर्वच्या सर्व, १४ हजार इमारती धोकादायक आहेत. अशावेळी पावसाळ्यात या इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दरवर्षी या इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारती शोधून त्यांची यादी जाहिर केली जाते. पावसाळ्यापूर्वी या इमारतीतील घरे रिकामी करुन घेतली जातात. त्यानुसार यंदा २० इमारतींचा समावेश अतिधोकादायक इमारतींच्या यादीत आहे. या २० इमारतींमध्ये ४९४ निवासी आणि २१७ अनिवासी असे एकूण ७११ गाळे आहेत. यातील ३६ निवासी गाळ्यातील कुटुंबांनी स्स्वतःची निवार्याची पर्यायी व्यवस्था आधीच केली आहे. तर ४६ कुटुंबांना म्हाडाकडून संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे यादी जाहिर झाल्यानंतर दुरूस्ती मंडळासमोर ४१२ निवासी गाळ्यांमधील कुटुंबांना संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याचे आव्हान होते. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही कुटुंब संक्रमण शिबिरात वा इतरत्र स्थलांतरीत झाले. तर घरे रिकामी न करणार्या २५८ कुटुंबांना दुरूस्ती मंडळाकडून सूचना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-केवळ ११ तास आधी परीक्षा पुढे ढकलली… नीट पीजी परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थी त्रस्त!

या सूचना नोटीशीनंतर ८२ कुटुंबांनी घरे रिकामी केली असून अद्याप १७६ जणांनी घरे रिकामी केली नसल्याची माहिती दुरूस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. म्हणजेच अजूनही १७६ कुटुंबांचे अतिधोकादायक इमारतीत वास्तव्य असून त्यांना लवकरात लवकर संक्रमण शिबिरात वा इतरत्रल स्थंलातरित करत इमारती रिकाम्या करुन घेणे गरजेचे आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात दुरूस्ती मंडळाच्या मुख्य अधिकार्यांसह वरिष्ठ अधिकार्यांनी या इमारतींची पाहणी करत रहिवाशांशी संवाद साधला. त्याना घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या. या सूचनेनंतर जे कोणी रहिवाशी येत्या काही दिवसात घरे रिकामी करणार नाहीत, त्यांना पोलीस बळाचा वापर करत घराबाहेर काढण्याचा विचार सुरु असल्याचेही दुरूस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.

आणखी वाचा-हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रम, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचा पुढाकार

म्हणून रहिवाशांचा स्थलांतरास विरोध

म्हा़डाकडून इमारती रिकाम्या करुन घेतल्यानंतर वा संक्रमण शिबिरात गेल्यानंतर आपण परत केव्हा आपल्या हक्काच्या घरी येऊ याची कोणतीही शाश्वती नसते. इमारतीचा पुनर्विकास होईल का, झालाच तर कधी होईल याचीही शाश्वती नसते. वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात रहावे लागते. त्यामुळे रहिवाशांचा घरे रिकामी करण्यास विरोध असते. त्याचवेळेस दुरूस्ती मंडळाची संक्रमण शिबिरे अनेकदा रहिवाशांच्या मूळ इमारतीपासून दूर असतात. दक्षिण मुंबईत इमारत असताना मोठ्या संख्येने उपनगरात संक्रमण शिबिराचे गाळे असल्यानेही रहिवाशी घरे रिकामी करण्यास नकार देताना दिसतात. हे चित्र दरवर्षी असते आणि दुरुस्ती मंडळाला पोलीस बळाचा वापर करत इमारती रिकाम्या करुन घ्याव्या लागतात.