गेले वर्षभर दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या राज्यातील जनतेला मान्सूनच्या सलामीने सुखद दिलासा दिला आहे. गेल्या आठ दिवसांत राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्य़ांपेक्षा जास्त पाऊस झाला
आहे. दुष्काळग्रस्त भागातील तालुक्यांमध्येही चांगला पाऊस झाला आहे. परिणामी टँकरची संख्या कमी होऊ लागली आहे. छावण्यांतील जनावरेही आता आपापल्या गोठय़ात परतू लागली आहेत. खरीपाच्या पेरणीसाठीही बळीराजाची धावपळ सुरू झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी राज्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात मान्सूनने सलामीच दमदार दिली आहे. कोकण विभागातील २९, नाशिक-२८, पुणे २९, कोल्हापूर-२२, अमरावती-२७, नागपूर-८ आणि दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागलेल्या मराठवाडय़ातील ३४ तालुक्यांमध्ये शंभर टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. २५ तालुक्यांमध्ये २५ टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. २९ तालुक्यांमघ्ये २५ ते ५० टक्के, ५६ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के आणि ६८ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. पावसाची सुरुवात चांगली झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरीणासाठी तयारी सुरु केली आहे. आता पर्यंत ०.३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
गेल्या आठवडय़ापर्यंत सुमारे १४ हजाराहून अधिक गावे व वाडय़ांना ५५०० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यात आता किंचितशी घट झाली आहे. टँकरची संख्या ५४५६ पर्यंत खाली आली आहे. चारा छावण्यांमध्ये दहा लाखाच्या जवळपास जनावरे दाखल करण्यात आली होती. पहिल्या पावसानंतर छावण्यांतील जनावरांची संख्याही कमी होऊ लागली आहे.
राज्यातील ११ जिल्ह्य़ांमधील १२४४ छावण्यांमध्ये ८ लाख ४६ हजार ३३९ जानावरे असल्याची माहिती देण्यात आली. पाऊस चांगला झाला असला तरी धरणांतील पाणीसाठय़ांमध्ये मात्र अजून फारशी वाढ झालेली नाही. सध्या राज्यातील लघु, मध्यम व मोठय़ा धरणांमध्ये सरासरी १४ टक्के पाणीसाठा आहे.
गेल्या आठवडय़ापर्यंत सुमारे १४ हजाराहून अधिक गावे व वाडय़ांना ५५०० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यात आता किंचितशी घट झाली आहे. टँकरची संख्या ५४५६ पर्यंत खाली आली आहे. चारा छावण्यांमध्ये दहा लाखाच्या जवळपास जनावरे दाखल करण्यात आली होती. पहिल्या पावसानंतर छावण्यांतील जनावरांची संख्याही कमी होऊ लागली आहे.

Story img Loader