पवई तलावात मोठया प्रमाणात मगरींचा अधिवास असून मुंबई महानगरपालिकेने केलेल्या गणतीमध्ये पवई तलावात साधारण १८ प्रौढ मगरी असल्याचे निदर्शनास आले आहे.
आयआयटी, मुंबई, रेनिसंस हॉटेल, पवई उद्यानाजवळ पवई तलावात मगरींचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. तसेच तलावातील छोट्या उंचवट्यावर अधूनमधून मगरींचे दर्शन घडते. पवई तलावातील मगरींचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदा गणना केली. एका पशु वैद्यकीय पथकामार्फत मगरींची गणती करण्यात आली. या मोजणी दरम्यान पवई तलावात १८ मगरी असल्याचे निदर्शनास आले.
तलावाच्या संवर्धनाची मागणी –
अनेकदा मोठ्या मगरी पवई तलावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील वाहतुकीमुळे होणारे ध्वनिप्रदुषण आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा मगरींना त्रास होतो. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मगरींच्या पहिल्याच गणनेच्या पार्श्वभूमीवर पवई तलावाचे संवर्धन करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
किनाऱ्यावर आल्यावर पुन्हा तलावात जाण्यासाठी योग्य मार्ग मिळणे आवश्यक –
“पवई तलावातील मगरींना किनाऱ्यावर आल्यावर पुन्हा तलावात जाण्यासाठी योग्य मार्ग मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा असता कामा नये. मात्र, मुंबई महानगरपालिकेने तेथे अनधिकृत बांधकाम केले आहे. हे बांधकाम लवकरात लवकर हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेने अद्याप कार्यवाही केलेली नाही. ” असे ‘वनशक्ती’चे प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी सांगितले आहे.