मंत्र्यांनी आपली व कुटुंबीयांची दर वर्षी मालमत्ता जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आदेशाला राज्य मंत्रिमंडळातील बहुतांश सहकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा सूचना करूनही गृह, उद्योग, महसूल सहकार, ग्रामविकास मंत्र्यांनी आपापल्या मालमत्तेचा तपशील देण्यास टाळाटाळ केली आहे.
अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आणली आहे. केंद्र सरकारने मंत्र्यांसाठी लागू केलेल्या आचारसंहितेनुसार प्रत्येक मंत्र्याला स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या मालमत्तेचा तपशील दर वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्र्याना सादर करणे बंधनकारक आहे. मात्र काही मातब्बर मंत्री ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आढळून आले आहे. मंत्रिमंडळातील ४० पैकी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह २२ मंत्र्यांनी आपल्या मालमत्ता आणि दायित्वाचा तपशील सादर केला आहे.  विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी  मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर १० डिसेंबर रोजी मंत्र्यासाठी आचारसंहिता लागू केली. पहिल्या वर्षी कोणत्याच मंत्र्याने आपल्या मालमत्तेचा तपशील दिला नाही, तर दुसऱ्या वर्षी १६ मंत्र्यांनी हा तपशील दिला. मात्र यंदा त्यात २२ पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता न पाळणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

तपशील न देणारे मंत्री
गृहमंत्री आर. आर. पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, वस्त्रोद्योगमंत्री नसिम खान, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत, रोहयोमंत्री नितीन राऊत,
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे या मंत्र्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिलेला नाही. तसेच नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, रणजीत कांबळे, सचिन अहिर, गुलाबराव देवकर, राजेंद्र मुळक, सतेज पाटील, प्रकाश सोळंके या राज्यमंत्र्यांनीही आपल्या मालमत्तेचा तपशील दिलेला नाही.

तपशील देणारे मंत्री
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, अन्न आणि औषध प्रशासनमंत्री मनोहरा नाईक, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री मधुकर चव्हाण यांचा समावेश आहे.