अध्यापक नियुक्तीच्या निर्णयाला मात्र बगल
रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, लहान मुलांचा विभाग, मनसोपचार, कॅन्सर, मूत्रपिंड विभाग, हृदयशल्यक्रिया, परिचारिका प्रशासन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तज्ज्ञ परिचारिकांची आवश्यकता मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर सध्या शासकीय परिचारिका महाविद्यालयांमध्ये केवळ परिचारिका अभ्यासक्रमात केवळ लहान मुलांसाठीचा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. काळाची गरज ओळखून वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने वेगवेगळ्या १८ क्षेत्रांसाठी सुपरस्पेशालिटी परिचारिका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये विविध स्पेशालिटी विभाग आहेत. तथापि या विभागात त्या विषयाच्या तज्ज्ञ परिचारिका उपलब्ध नाहीत. अनुभवातून परिचारिका घडत असल्या तरी स्पेशालिटी विभागांची गरज ओळखून परिचारिकांसाठी विशेष उपचारांचे अभ्यासक्रम तयार केल्यास रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल ही बाब लक्षात घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परिचारांसाठी विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेश जारी केले. या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ३० जानेवारी रोजी सविस्तर प्रस्ताव शासनाला सादरही केले.
परिचारिकांसाठी पीएच.डी.सह अस्थव्यंग, शस्त्रक्रिया विभागातील प्रशिक्षण, एमफील, नेत्रशल्य चिकित्सा, अत्यावश्यक व आपत्कालीन आदी १८ विषयांमध्ये परिचारिका अभ्यासक्रमांना मान्यता मिळावी यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. यानुसार प्रत्येक विषयासाठी ३० प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतही वैद्यकीय शिक्षणाप्रमाणे सावळा गोंधळ असताना आता नवीन परिचारिका अभ्यासक्रमांचा निर्णय घेतना अंमलबजावणीसाठी पुरेसे अध्यापक व अन्य आनुषंगिक गोष्टींची तरतूद न केल्यामुळे नवीन गोंधळ निर्माण झाल्याचे काही ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण संचालनालयापुढे प्रश्न..
मंत्री विनोद तावडे यांनीच पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असला तरी विभागाने प्रस्ताव सादर केल्यानंतर अद्यापि त्याला अंतिम मान्यता देण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर हे अठरा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला अध्यापक वर्गही भरण्याविषयी कोणतीही तरतूद केलेली नाही. परिणामी अभ्यासक्रम कसा सुरू करायचा, असा प्रश्न वैद्यकीय शिक्षण संचालनालयापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे पदनिर्मिती न करताच अभ्यासक्रम कसा राबवायचा, असा प्रश्न वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगरे यांनी अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांना पत्र पाठवून विचारला आहे.