मुंबई : पुनर्वसनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याच्या कारणास्तव अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या आरोपाप्रकरणी दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. अल्पवयीन असताना गुन्हेगारी कृत्यात अडकलेल्या आरोपीला कुटुंबीयांसमवेत राहण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करताना स्पष्ट केले.
हेही वाचा >>> धक्कादायक! वर्ध्यात १७ वर्षीय पोटच्या मुलीवर वडिलांकडून सलग तीन वर्षे बलात्कार, आरोपी बापाला अटक, वाचा संतापजनक घटनाक्रम…
न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने हे आदेश दिले. अटकेनंतर डोंगरी येथील निरीक्षणगृहात ठेवण्यात आलेल्या आरोपीवर २०२० मध्ये सात वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तो १६ वर्षांचा होता. न्यायालयाने त्याची सुटका करण्याचे आदेश देताना, आरोपी आता सज्ञान झाला आहे. शिवाय त्याचे शिक्षण थांबवले जाऊ शकत नाही. किंबहुना त्याला त्याच्या कुटुंबासह राहण्याची परवानगी दिल्यास तो स्वत:ला त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार विकसित करण्यास सक्षम ठरेल, असे न्यायालयाने म्हटले. निरीक्षणगृहात दीर्घकाळ राहिल्याने त्याचे जीवन थांबले आहे.
हेही वाचा >>> अमरावती : शिक्षकाने एका शिक्षिकेला रात्री मोबाइलवर कॉल केला व म्हणाला…
परंतु योग्य प्रकारच्या संधी, मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्यास त्याचे सोने करण्याची त्याच्यात क्षमता आहे, असा दावा आरोपीने जामिनाची मागणी करताना केला होता. त्यावर निरीक्षणगृहात असताना पुनर्वसनाच्या प्रयत्नांना आरोपीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तो त्याच्या कुटुंबासोबत पुन्हा राहण्यास पात्र असून ते त्याच्या हिताचे असेल, असेही न्यायालयाने नमूद केले. आरोपीवरील आरोप निर्विवादपणे गंभीर आहे. परंतु त्याला अल्पवयीन असल्याचा फायदा मिळणे आवश्यक आहे आणि म्हणूनच त्याला बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याचा लाभ नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपी किंवा त्याच्या कुटुंबाकडून पीडितेला कोणताही धोका असल्याचे पुढे आलेले नाही. त्यामुळे आरोपीची जामिनावर सुटका केली जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.