लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण मुंबईतील सीपी टँक परिसरात ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून १८ वर्षीय मुलगीचा मृत्यू झाला. मैत्रीणीच्या दुचाकीवर मागे बसून मुलगी जात होती. त्यावेळी दुचाकीचा तोल गेल्यामुळे दोघीही खाली कोसळल्या.
दरम्यान, दुचाकी चालवणाऱ्या १८ वर्षीय तरूणीकडे चालक परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच अपघातानंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता पलायन केले. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही हृदयद्रावक घटना परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.
सीपी टँक परिसरात सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिनिका विकी बाफना (१८) व तिची मैत्रीण सिया उत्तम मेहता (१८) या दोघी दुचाकीवरून सी.पी. टँक सर्कल येथून कुंभार तुकडाच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी डिनिका बाफना दुचाकी चालवत होती. समोर असलेल्या ट्रकच्या डाव्या बाजून पुढे जाण्याचा प्रयत्न तिने केला. पण त्यावेळी डिनिकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीचा वेग कमी झाला व दोघींचा तोल गेला. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली कोसळल्या. सिया मेहता दुचाकीवरून पडली आणि तिच्या अंगावरून ट्रकचे मागील चाक गेले. सियाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
व्ही. पी. रोड पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत दुचाकी चालवणाऱ्या डिनिका विकी बाफना हिच्याकडे वाहन चालक परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. चालक परवाना नसतानाही भरधाव वेगाने दुचाकी चालवून ती सिया मेहताच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. तसेच अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने वाहन थांबवून जखमी तरूणीला वैद्यकीय मदत देणे अपेक्षित होते. पण ट्रक चालकाने तसे न करता तेथून पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी भारतीय न्याय सहित कलम १०६ (१), २८१, १२५ (१), तसेच मोटर वाहन कायता कलम ३ व १३४ (अ) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली. आरोपीने वैद्यकीय मदत न करता पळ काढल्याचा त्याच्याविरोधात आरोप आहे. ही घटना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.