लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारच्या एकात्मिक नगर वसाहत योजनेअंतर्गत पनवेल, खालापूरमध्ये सध्या १,८२३ घरांचे बांधकाम सुरू आहे. या घरांचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०२६मधील सोडतीसाठी मंडळाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ही १,८२३ घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या घरांमधील १,२२० घरे ही हिरानंदानी यांच्या गृहप्रकल्पातील आहेत.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे मिळावीत यासाठी राज्य सरकारने २० टक्के सर्वसमावेशक योजनेनंतर एकात्मिक नगर वसाहत योजनाही आणली. या योजनेनुसार, विशेष नियोजन प्राधिकरणाच्या अखात्यारितील ४० हेक्टरपेक्षा मोठ्या भूखंडांवरील प्रकल्पातील तीन टक्के घरे विशेष नियोजन प्राधिकरणाला हस्तांतरित करणे विकासकांना बंधनकारक आहे. ही घरे म्हाडाला सोडतीसाठी उपलब्ध करून देणेही विशेष नियोजन प्राधिकरणाला क्रमप्राप्त आहे. एमएसआरडीसीची नियुक्ती पनवेल, खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे.
आणखी वाचा-झोपु कायद्याच्या फेरआढाव्यासाठी विशेष खंडपीठ, शुक्रवारपासून सुनावणी
पनवेल, खालापूरमध्ये सध्या या योजनेअंतर्गत १,८२३ घरांची कामे सुरू असल्याची माहिती एमएसआरडीसीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. पनवेल, खालापूरमधील खानावली तळेगावमध्ये गोदरेज समुहाच्या प्रकल्पात अत्यल्प गटासाठी ६०३ घरे बांधण्यात येत आहेत. ही घरे २७.७८ चौरस मीटरची आहेत. तर, पनवेल, खालापूरमधील बारवाई, भोकरपाडा, पानशील, तळेगाव येथील हिरानंदानी समुहाच्या प्रकल्पात १,२२० घरांचे बांधकाम एकात्मिक योजनेअंतर्गत सुरू आहे. परवडण्याजोग्या घराचे सामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.
सदनिकांचा तपशील
हिरानंदानी प्रकल्पातील १,२२० घरांमध्ये अत्यल्प गटासाठीच्या २६.७५२ चौरस मीटरच्या २३७, अल्प गटासाठीच्या ३८.००९ चौरस मीटरच्या ३२०, अत्यल्प गटासाठीच्या २६.७५२ चौरस मीटरच्या २५९, अल्प गटासाठीच्या ३८.००९ चौरस मीटरच्या ४०४ घरांचा समावेश आहे. त्यामुळे, ही घरे ताब्यात आल्यानंतर तात्काळ म्हाडाच्या कोकण मंडळाकडे वर्ग केली जातील, अशीही माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.